(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील रस्त्यांवर ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन चालकांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. तेलीआळी नाका ते आठवडा बाजार या मार्गावर रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही चालकांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनाथ बाळू पिसाळ (वय ३८, मूळ रा. वाई, सातारा, सध्या रा. आठवडा बाजार, रत्नागिरी) आणि वैभव रामचंद्र कदम (वय ३८, मूळ रा. भेलसई, खेड, सध्या रा. खेर्डी, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या चालकांची नावे आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ वाढलेली असताना काही ठिकाणी मोठी वाहने रस्त्यालगत अथवा रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याबरोबरच इतर वाहनचालकांना अडथळ्याचा सामना करावा लागतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
तेलीआळी नाका ते आठवडा बाजार मार्गावर रहदारीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने ट्रॅव्हल्स उभ्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई केली जाणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

