(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
अंथरुणावरून उठताना अचानक जमिनीवर पडल्याने डोक्याला दुखापत झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. रामचंद्र गोविंद शिवगण (वय ७०, रा. सोनवडे-मधलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. रामचंद्र शिवगण हे खबर देणारे योगेश रामचंद्र शिवगण यांचे वडील होते. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास रामचंद्र शिवगण हे घरातील अंथरुणावरून उठत असताना अचानक जमिनीवर पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.
या घटनेनंतर योगेश शिवगण यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सकाळी सुमारे ९.३० वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ अन्वये बीएनएसएस कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.


