(रत्नागिरी)
शहरातील मारुती मंदिर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इलेक्ट्रिकल्स दुकानातील कामगारानेच मालकाचा विश्वासघात करत तब्बल चार लाख ६७ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लांजा तालुक्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परेश महादेव बापर्डेकर (30, रा. कातळवाडी कोंडये, ता. लांजा) असे आरोपीचे नाव असून, त्याने विक्रीतून जमा झालेली रक्कम व इतर व्यापाऱ्यांकडून आलेली देयके स्वतःकडेच ठेवत अपहार केल्याचा आरोप आहे.
दुकानाचे मालक अमरेश सुरेश पावसकर (42, रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. डिसेंबर 2024 पासून ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत बापर्डेकर त्यांच्या दुकानात कार्यरत होता. या काळात त्याने रोख रक्कम जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शहर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर बापर्डेकरविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 408 नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

