(देवरुख / वार्ताहर)
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष सोनू मायंगडे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. वाशिम येथील श्री. रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेजच्या संशोधन केंद्रातून त्यांनी आपले संशोधन पूर्ण केले. प्रा. डॉ. संजय मधुकरराव साळवे, ग्रंथपाल, श्री. रामराव सरनाईक सोशल वर्क कॉलेज, वाशिम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांच्या संशोधनाचा विषय “Adoption of Artificial Intelligence in Library Services in Indian Institutes of Technology (IIT’s) in India: A Study” अर्थात “भारतातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांच्या (IIT’s) ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब : एक अभ्यास” असा आहे. त्यांच्या संशोधनातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ग्रंथालय सेवा अधिक जलद, अचूक, स्वयंचलित आणि वापरकर्ताकेंद्रित करता येऊ शकतात, असे स्पष्ट झाले आहे. तसेच एआय प्रशिक्षण, तांत्रिक पायाभूत सुविधा, संस्थात्मक पाठिंबा, वापरकर्ता जागरूकता, डेटा सुरक्षा आणि नैतिकता या बाबी ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकारण्यासाठी महत्त्वाच्या असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. भविष्यातील एआय आधारित ग्रंथालय सेवांसाठी दिशादर्शक आराखडा देण्याचा प्रयत्नही या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी विविध आयआयटीमधील ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी आणि वापरकर्त्यांचे सहकार्य लाभले.
प्रा. डॉ. मायंगडे यांचा शैक्षणिक प्रवास रत्नागिरी तालुक्यातील भोके मायंगडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, भोके मायंगडेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण पंचशील ज्ञानपीठाचे माध्यमिक विद्यालय, करबुडे-लाजूळ येथे, तर अकरावी-बारावीचे शिक्षण अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यांनी यूजीसी-नेट आणि सेट या दोन्ही पात्रता परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.
प्रा. डॉ. मायंगडे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पुण्यातील International Institute of Technology (I2IT) येथे कार्यालय आणि ग्रंथालय विभागातून झाली. तेथे त्यांनी १२ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांना फिनोलेक्स ग्रुपचे चेअरमन स्व. प्रल्हादजी छाब्रिया तसेच संस्थेच्या प्रमुख डॉ. अरुणा कटारा यांचे सहकार्य लाभले. त्यानंतर गेल्या ११ वर्षांपासून ते आठल्ये-सप्रे-पित्रे स्वायत्त महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रंथालय सेवा विकसित करण्यासाठी ते विविध वाचन उपक्रम, पुस्तक प्रदर्शने आणि डिजिटल ग्रंथालयीन सेवा राबवत आहेत.
ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रात त्यांच्या नावावर १४ पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन लेखांचे प्रकाशन व सादरीकरण झाले आहे. ते इंडियन लायब्ररी असोसिएशनचे आजीवन सभासद असून विविध कार्यशाळा, सेमिनार, परिषद, स्वयम अभ्यासक्रम आणि रिफ्रेशर कोर्समध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. ग्रंथालयातील पुस्तके आणि मुद्रित साहित्याच्या निर्जंतुकीकरणासाठी विकसित करण्यात आलेल्या “Portable Book Sanitizing Chamber” या अभिनव उपकरणाच्या बाह्य रचनेसाठी त्यांच्या डिझाइनला पेटंटही प्राप्त झाले आहे.
प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांच्या पीएच.डी. पदवी संपादनाबद्दल संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
भोके मायंगडेवाडी येथील छोट्याशा जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला प्रा. डॉ. सुभाष मायंगडे यांचा शैक्षणिक प्रवास पीएच.डी. पदवीपर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांची ही शैक्षणिक वाटचाल आणि संशोधनातील यश प्रेरणादायी ठरले आहे.

