( नवी दिल्ली )
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने प्रथमच इयत्ता ९ वीच्या सामाजिक विज्ञानाच्या नव्या पाठ्यपुस्तकात १९७५ ते १९७७ या कालावधीतील आणीबाणीवर स्वतंत्र विभाग समाविष्ट केला आहे. ‘Understanding Society: India and Beyond’ या नव्या पुस्तकात आणीबाणीचा उल्लेख भारतीय लोकशाहीसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून करण्यात आला आहे.
एनसीईआरटीच्या अधिकाऱ्यांनीही याची पुष्टी केली असून, इयत्ता ९ वीच्या अभ्यासक्रमात पहिल्यांदाच आणीबाणीवर स्वतंत्रपणे सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, देशात आणीबाणी लागू होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
पुस्तकात काय नमूद करण्यात आले आहे?
नव्या पुस्तकानुसार, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारविरोधात जनतेत असंतोष वाढत होता. बेरोजगारी, महागाई आणि गैरव्यवस्थापनाच्या आरोपांमुळे देशभरात आंदोलन आणि निदर्शने सुरू झाली होती. यानंतर जून १९७५ मध्ये ‘अंतर्गत अशांतता’ (Internal Disturbance) या कारणावर आधारित राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. या काळात लोकशाही संस्था, नागरी स्वातंत्र्य आणि घटनात्मक प्रक्रियेवर झालेल्या परिणामांचाही पुस्तकात संदर्भ देण्यात आला आहे.
नव्या अभ्यासक्रमाची चर्चा
एनसीईआरटीच्या या बदलामुळे नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती अधिक व्यापकपणे मिळावी, या उद्देशाने हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आल्याचे मानले जात आहे.

