(मुंबई)
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीच्या निदान सुविधा उपलब्ध करून देत 94 बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी आशा निर्माण केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य देतानाच कंपनीने आरोग्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांना तातडीच्या निदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अफकॉन्सने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून “कर्करोगाचा संशयित आजार असलेल्या बालरुग्णांसाठी आपत्कालीन निदान सहाय्य सेवा” या उपक्रमासाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. या मदतीमुळे 94 बालकांना वेळेत आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि कर्करोगाचे निदान उपलब्ध होऊ शकले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कर्करोगासारख्या गंभीर आजारात वेळेवर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे असते. आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना आवश्यक तपासण्या करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत अफकॉन्सने दिलेली मदत ही केवळ आर्थिक सहाय्य नसून अनेक बालकांच्या उपचार प्रक्रियेला गती देणारी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राची अशी सकारात्मक साथ मिळाल्यास आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाची उद्दिष्टे अधिक वेगाने साध्य होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत होण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॉर्पोरेट क्षेत्राच्या सामाजिक बांधिलकीचे हे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अफकॉन्सने शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रात केलेली गुंतवणूक शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. समाजातील गरजू घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा CSR उपक्रमांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते.

