(दापोली/ रत्नागिरी प्रतिनिधी)
विश्वासाने परिधान करण्यासाठी घेतलेले सोन्याचे दागिने परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे, तसेच महिला बचतगटाच्या सचिवपदाचा गैरफायदा घेत तब्बल लाखो रुपयांच्या हप्त्यांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यातील गिम्हवणे-सुतारवाडी येथे समोर आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सौ. पूर्वा गणेश देवघरकर (३८, रा. गिम्हवणे-सुतारवाडी, ता. दापोली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिज्ञा विश्वास देवघरकर (३१) आणि विश्वास रमेश देवघरकर (३८), दोघेही रा. गिम्हवणे-सुतारवाडी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची एकूण रक्कम ९ लाख ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीच्या मालकीचे सुमारे सहा तोळे वजनाचे मंगळसूत्र आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी १६ मे २०२६ रोजी परिधान करण्यासाठी विश्वासाने घेतले. मात्र, त्यानंतर हे मंगळसूत्र परस्पर बँकेत गहाण ठेवण्यात आले. त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून दागिना परत न केल्याचा आरोप आहे. याचप्रमाणे फिर्यादीच्या भावकीतील अनुष्का उमेश देवघरकर यांच्या मालकीची सुमारे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले आरोपी क्रमांक १ हिने २३ एप्रिल रोजी परिधान करण्यासाठी घेतली. मात्र, ही कर्णफुलेही परस्पर बँकेत गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा गंभीर भाग महिला बचतगटाशी संबंधित आहे. आरोपी क्रमांक १ हिची विश्वकर्मा समूह महिला मंडळ बचतगटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. बचतगटातील महिलांच्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरण्याची जबाबदारी तिच्यावर विश्वासाने सोपविण्यात आली होती. मात्र, या विश्वासाला तडा देत आरोपीने फिर्यादीसह बचतगटातील १२ महिलांकडून सुमारे ४ लाख ६० हजार रुपये हप्त्याच्या स्वरूपात जमा केले. ही रक्कम बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आणि नंतर ती परत न केल्याचा आरोप आहे.
कर्जाच्या हप्त्यांसाठी जमा केलेले पाच लाखही गायब
एचडीएफसी बँकेमार्फत महिला बचतगटाच्या माध्यमातून सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी फिर्यादीसह इतर महिलांनी आरोपी क्रमांक १ हिच्याकडे विश्वासाने सुमारे पाच लाख रुपये जमा केले होते. मात्र, हे पैसेही वेळेत कर्जाच्या हप्त्यांसाठी जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकीकडे विश्वासाने दिलेले सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवणे आणि दुसरीकडे महिलांनी कर्जाचे हप्ते भरण्यासाठी दिलेली लाखो रुपयांची रक्कम हडपल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाने बचतगटातील आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक १६३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१६(२) आणि ३(५) अन्वये १७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

