(दापोली)
दापोली शहरातील कोळंबा आळी परिसरात रविवारी मध्यरात्री एका धोकादायक इमारतीच्या सेफ्टी टँकमध्ये स्फोट झाला, यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. या स्फोटामुळे टाकीतून सांडलेला मैला थेट पंचायत समिती परिसरातील घरांमध्ये पोहोचल्याने दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सदर इमारत डोंगर उत्खनन करून उभारण्यात आलेल्या तीन सदनिकांच्या संकुलातील असून, अयोग्य बांधकाम पद्धती व नियोजनाचा अभाव यामुळे ही गंभीर परिस्थिती ओढवली असल्याचा स्थानीय नागरिकांचा आरोप आहे. इमारतीच्या पायाभूत रचनेवर स्फोटाचा परिणाम झाल्यामुळे ती कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नगराध्यक्षा कृपा घाग यांची घटनास्थळी तातडीने भेट
घटनेची गंभीर दखल घेत नगराध्यक्षा श्रीमती कृपा घाग यांनी सोमवारी सकाळी धोकादायक इमारतीची पाहणी केली. प्रशासनाला तातडीने चौकशी करून कठोर कारवाईचे आदेश त्यांनी यावेळी दिले.
नगराध्यक्षा म्हणाल्या, “या प्रकाराची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचू नये यासाठी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.”
नागरिकांकडून कारवाईची मागणी
या घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे. भविष्यात आणखी दुर्घटना टाळण्यासाठी इमारतीच्या संरचनात्मक तपासणीसह जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“सेफ्टी टँकचा स्फोट हे एखाद्या मोठ्या दुर्घटनेचं लक्षण आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास परिणाम गंभीर होतील,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.

