(राजापूर /प्रतिनिधी)
सोन्याचे दागिने गहाण ठेवून त्यातून मिळालेली रक्कम तसेच रोख पैसे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी आंबेरकोणी साखर येथील दाम्पत्याविरोधात नाटे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तब्बल ४ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी संगीता अशोक धुमाळ (४०, रा. आंबेरकोणी साखर, राजापूर) यांनी नाटे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रवींद्र पुनाजी राड्ये आणि त्यांची पत्नी ऋतिका रवींद्र राड्ये यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, रवींद्र राड्ये यांनी त्यांची पत्नी ऋतिका हिच्या नावावर संगीता धुमाळ यांचे जुने वापरते सोन्याचे दागिने श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादित, साखर-राजापूर येथे गहाण ठेवले. या दागिन्यांवरून ३ लाख ५४ हजार रुपये रोख रक्कम घेण्यात आली. याशिवाय संगीता धुमाळ यांच्याकडील ८० हजार रुपयांची रोख रक्कमही दोघांनी घेतल्याचा आरोप आहे.
दागिने आणि पैसे परत मिळावेत यासाठी धुमाळ यांनी संबंधितांकडे वारंवार तगादा लावला. मात्र, प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. एवढेच नव्हे, तर रक्कम परत मागितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दागिने आणि पैसे परत मिळावेत यासाठी धुमाळ यांनी यापूर्वीही पाठपुरावा केला होता. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही प्रत्यक्ष रक्कम अथवा दागिने परत मिळाले नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे प्रकरणाला अखेर कायदेशीर वळण मिळाले असून, १७ ऑगस्ट २०२६ रोजी नाटे पोलिस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आता पोलिस तपासात दागिने नेमक्या कोणत्या परिस्थितीत गहाण ठेवण्यात आले, त्यातून मिळालेली रक्कम कुठे वापरण्यात आली आणि रोख रक्कम परत का करण्यात आली नाही, याचा उलगडा होणे अपेक्षित आहे. विश्वास संपादन करून घेतलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदाराला पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागणे हीच या प्रकरणाची गंभीर बाजू आहे. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास किती वेगाने पुढे जातो आणि तक्रारदाराला प्रत्यक्ष न्याय कधी मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

