(दापोली)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थिनींनी लघु-नाटिका सांस्कृतिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आयोजित या महोत्सवात महाविद्यालयातील कु. गायत्री मांगडे, मृणाल ठाकरे, ऋतुजा साळुंखे, श्रद्धा डावले, आर्या गायकवाड आणि आर्या कोठावळे यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थिनींनी “आम्ही वेडे आहोत” या शीर्षकावर आधारित लघु-नाटिकेत देशभरात घडत असलेल्या ज्वलंत सामाजिक आणि राजकीय विषयांना स्पर्श केला. पक्ष फोडी, आमदार-खासदारांचे पक्ष बदलणे, लोकशाही, पत्रकारिता, विधायिका, हुकूमशाही व राजकीय व्यवस्था यासारख्या घटकांवर आधारित हा नाटकाचा सादरीकरण अत्यंत प्रभावी आणि स्वउत्स्फूर्तपणे पार पडले. अनुभव नसतानाही विद्यार्थिनींनी सादरीकरणात उत्कृष्ट अभिनय आणि प्रस्तुती दिल्याने ते कौतुकास्पद ठरले.
संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले, तसेच प्राध्यापिका सिद्धी फरांदे व सिद्धि नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींचे हे यश शक्य झाले.
या सादरीकरणातून विद्यार्थिनींनी कलेच्या माध्यमातून सामाजिक जागृती, संस्कृती जपणे आणि समाजातील महत्त्वाचे प्रश्न समोर आणणे याचा उद्देश उत्कृष्टरीत्या साधला असून, त्यांच्या कलेचे आणि समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

