(दापोली / रत्नागिरी)
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दापोली दौऱ्यादरम्यान गिम्हवणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अभ्यासाविषयी विचारपूस केली, तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या आधुनिक शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दापोलीनजीक असलेल्या या शाळेतील डिजिटल क्लासरूम आणि अद्ययावत डिजिटल स्टडी क्लासरूम असलेल्या ‘आयडियल सेंटर’ला मुख्य सचिवांनी भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधांची माहिती घेतली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
शाळेतील वर्गांना भेट देताना राजेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या अभ्यासाची प्रगती जाणून घेतानाच शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचाही आढावा घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम त्यांनी जाणून घेतले.
या पाहणी दौऱ्यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, प्रांताधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक आणि केंद्रप्रमुख सुनील कारखिले यांच्यासह स्थानिक अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.


