(रत्नागिरी / दापोली)
दापोली तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. सचिन तुकाराम शिंदे (वय ४८, रा. जालगाव चोरगेवाडी, ता. दापोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन शिंदे हे कोणताही कामधंदा करत नव्हते. त्यांना दारूचे व्यसन होते. यावरून पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद होत असल्याची माहिती पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आली आहे.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास सचिन शिंदे यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आले. या प्रकारानंतर त्यांनी तातडीने शेजारील नागरिकांना बोलावले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तात्काळ खाली उतरवून उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे जालगाव चोरगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.१५ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये अपमृत्यू क्रमांक ८३/२०२६ अशी नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.


