(राजापूर/ तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कोंडतिवरे (डोंगरवाडी) येथील रहिवासी यशवंत खेमा आमटे (वय ६०) हे गुरुवार, दि. २ जुलै, रोजी सकाळी सुमारे १०.०० वाजण्याच्या सुमारास वाटूळ येथील मुचकुंदी नदीवरील पुलावरून नदीत उडी मारताना वाटूळ येथील प्रत्यक्षदर्शी मिलिंद चव्हाण यांनी पाहिल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, उडी मारताना यशवंत आमटे यांच्या अंगात तांबड्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची बरमुडा होती. या घटनेनंतर त्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसून, संबंधित यंत्रणांकडून शोधकार्य सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मुचकुंदी नदी ज्या-ज्या गावांच्या हद्दीतून वाहते, त्या सर्व गावांतील नागरिक, ग्रामस्थ, मच्छीमार, बोटचालक तसेच नदीकाठावरील परिसरातील रहिवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात, नदीकिनारी किंवा परिसरात संबंधित व्यक्तीबाबत कोणतीही माहिती, संशयास्पद बाब अथवा कोणता मृतदेह आढळून आल्यास ती माहिती तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासन किंवा संबंधित यंत्रणेला कळवावी.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे शोधकार्यात महत्त्वाची मदत होऊ शकते. त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

