( राजापूर / तुषार पाचलकर )
गेल्या १० ते १२ वर्षांपासून पाचल ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यावर चारचाकी वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. प्रल्हाद पड्यार (भंगार व्यवसायिक) या स्थानिक ग्रामस्थाकडून सतत रस्त्यावर वाहन पार्क केल्यामुळे काही नागरिकांना गैरसोय होत होती. सदर रस्त्याने चार ते पाच कुटुंबांची कायम रहदारी असते, तसेच त्यांना वाहनेही या रस्त्याने घरापर्यंत नेता येतं नव्हती, ही अडचण ग्रामपंचायत ला कळवण्यात आली होती, तरीपण यावर तोडगा निघाला नव्हता.
या संदर्भात अनेक ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पाचलकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. लेखी तक्रारी देऊनही संबंधित व्यक्तीस अनेकदा सूचना व समज देण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत संबंधित इसमाकडून हेकेखोर भूमिका कायम ठेवण्यात येत होती.
दरम्यान, काही ग्रामस्थांनी ही बाब पत्रकारांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी तात्काळ दखल घेत रायपाटण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे व रामदास पाटील यांना घटनास्थळी पाठवले.
पोलीसांच्या हस्तक्षेपामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागला असून रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली आहे. याबद्दल ग्रामस्थांकडून पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

