( राजापूर )
नगरपालिका निवडणुका जवळ येताच राजापूर शहरात अचानक ‘विकासकामांचा’ धडका सुरू झाला आहे. मात्र या कामांचा दर्जा आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, “ही कामे विकासासाठी नाहीत, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहेत,” अशी तीव्र टीका माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांनी केली आहे. शहराचा खरा विकास होतोय की भ्रष्टाचाराचा विकास, हे नागरिकांनी ठरवायचं, असे ही खलिफे म्हणाले.
दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या जवाहर चौक ते जकातनाका रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालकांसह नागरीक हैराण झाले आहेत. संतप्त नागरी प्रतिसादानंतर आता या रस्त्यावर खड्ड्यांवर पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यानंतर काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी, “जे स्वतःच्या प्रभागातील रस्ता चार महिन्यांत पूर्ण करू शकले नाहीत, त्यांना आता शहराचा विकास दिसू लागलाय,” असा उपरोधिक टोला खलिफे यांनी लगावला.
जवाहर चौक ते जकातनाका, महापुरुष घुमटी, मापारी मोहल्ला, बलबले मशीद, कोंडेतड ब्रिज हे सगळेच रस्ते आता अचानक सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येऊ लागले आहेत, असा उपहास त्यांनी व्यक्त केला. अर्धवट राहिलेली कामे, पहिल्याच पावसात उघडकीस आलेला दर्जा आणि ठेकेदारांऐवजी पक्षाचे कार्यकर्तेच ठेकेदार होऊन काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शहरात सध्या सुरू असलेली बहुतेक कामे वैयक्तिक फायद्याच्या हेतूने होत आहेत. विकासाच्या नावाखाली शहराची अवस्था बकाल होत आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही विकासाच्या आड येणार नाही, पण जनतेची फसवणूक सहन केली जाणार नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी जर योजना राबवल्या जात असतील, तर जनता यांना निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अॅड. खलिफे यांनी दिला.