(संगमेश्वर / एजाज पटेल)
रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला असून, आक्रमक नेते जितेंद्र चव्हाण यांची मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर मनसेच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर मुंबईहून रेल्वेने कोकणात परतलेल्या चव्हाण यांचे चिपळूणपासून संगमेश्वरपर्यंत ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पहार आणि भव्य शुभेच्छा फलकांनी त्यांच्या स्वागताचा उत्साह दिसून आला.
चिपळूण रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुंबईहून रेल्वेने चिपळूण येथे आगमन होताच मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रमंडळी आणि समर्थक मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना झिंदाबाद’, ‘राज ठाकरे अंगार है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, हार आणि पेढे देत चव्हाण यांचे स्वागत केले. फेरनियुक्तीचा आनंद कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. या उत्स्फूर्त स्वागताने भारावून गेलेल्या चव्हाण यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत सर्वांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्याचा विश्वास व्यक्त केला.
संगमेश्वर तालुक्यात ठिकठिकाणी सत्कार
चिपळूणनंतर संगमेश्वर तालुक्यात प्रवेश करताच चव्हाण यांच्या स्वागताची मालिका अधिकच रंगली. कडवई, तुरळ, चिखली आणि चोबारवाडी आदी गावांमध्ये ग्रामस्थ, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. कडवई येथील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच चोबारवाडी ग्रामस्थांनी पुष्पहार अर्पण करून चव्हाण यांचे अभिनंदन केले.
या स्वागत सोहळ्यात राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभाग घेतला. ‘राज मंडप डेकोरेटर्स’चे विजय कुवळेकर यांनी चव्हाण यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच रघुनाथ येलोंडे, कृष्णा पाचकले, सचिन हरेकर, देवकू फडकले, शांताराम बामणे, तुकाराम बामणे, मोहन कुंभार, दिनेश निवळेकर आणि संदीप येलोंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ व प्रतिष्ठित ग्रामस्थांनी चव्हाण यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.
चिपळूण ते संगमेश्वर महामार्गावर शुभेच्छांचे फलक
चिपळूण ते संगमेश्वर या संपूर्ण मार्गावर तसेच प्रमुख चौकांमध्ये समर्थकांकडून जितेंद्र चव्हाण यांच्या अभिनंदनाचे आणि शुभेच्छांचे भव्य फलक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या फेरनियुक्तीची चर्चा परिसरात रंगली असून, मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पद असो वा नसो, जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे नेते म्हणून जितेंद्र चव्हाण यांची ओळख आहे. यादववाडी ब्रिजचा प्रश्न असो किंवा कडवई रेल्वे स्थानकाचा प्रश्न, विविध स्थानिक समस्यांसाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्याविषयी जनतेमध्ये असलेला जिव्हाळा त्यांच्या स्वागतातून दिसून आला.
मध्य रत्नागिरीची संघटनात्मक जबाबदारी पुन्हा एकदा चव्हाण यांच्या खांद्यावर आल्याने मनसेच्या गोटात उत्साह वाढला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फेरनियुक्ती पक्षासाठी महत्त्वाची मानली जात असून, मध्य रत्नागिरीत संघटना अधिक मजबूत करण्याचे आव्हान आता चव्हाण यांच्यासमोर असणार आहे.
चिपळूण रेल्वे स्थानकापासून संगमेश्वर तालुक्यातील गावागावांत कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी आणि मित्रपरिवाराने केलेले हे उत्स्फूर्त स्वागत पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. माझा राजसाहेबांवर आणि कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास होता. राजसाहेबांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने पार पाडेन. कार्यकर्त्यांच्या आणि ज्येष्ठ मंडळींच्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी तसेच राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आगामी काळात मध्य रत्नागिरीत मनसेची ताकद अधिक वाढविण्यासाठी प्रयत्न करेन, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

