(छत्रपती संभाजीनगर / वृत्तसंस्था)
शिक्षकांच्या प्रश्नावरून महायुतीतील दोन आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यात पत्रांच्या माध्यमातून वाद रंगला आहे. शिक्षकांवरील कारवाईपासून विधानपरिषद रद्द करण्याच्या मुद्द्यापर्यंत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. त्यामुळे महायुतीतील या दोन घटक पक्षांच्या आमदारांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याचा तसेच खोटी कागदपत्रे सादर करून घरभाड्याची बिले उचलत असल्याचा आरोप त्यांच्या तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर कारवाई करण्यात आली आणि हजारो शिक्षकांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी रोखण्यात आली. याच कारवाईवर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी आक्षेप घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले.
शिक्षकांसाठी मुख्यालयी भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, तसेच त्यांना राहण्यासाठी घरे आहेत का, असा सवाल सतीश चव्हाण यांनी केला. शिक्षकांवरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रशांत बंब यांनाही पत्र लिहून विधानपरिषद रद्द करणार का, असा थेट प्रश्न उपस्थित केला. आमदारकी हुकूम चालवण्यासाठी नसून सेवा करण्यासाठी असते, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले.
सतीश चव्हाण यांच्या पत्राला प्रशांत बंब यांनीही उत्तर दिले. चुकीच्या शिक्षकांची पाठराखण करणे हा देशद्रोह असल्याचा आरोप बंब यांनी केला. चव्हाण यांना चुकीच्या शिक्षकांचे अंधभक्त असेही त्यांनी म्हटले. तसेच 18 वर्षे आमदार असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी काय केले, असा सवालही बंब यांनी चव्हाण यांना केला.
दरम्यान, प्रशांत बंब यांच्या पत्रावर सतीश चव्हाण यांनी सध्या मौनाची भूमिका घेतली आहे. प्रशांत बंब यांनी मला खूप मोठं प्रेमपत्र पाठवलं असून, ते आधी वाचतो आणि त्यानंतर प्रतिक्रिया देतो, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
या दोन्ही नेत्यांमधील संघर्षाला राजकीय पार्श्वभूमीही आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गंगापूर मतदारसंघातून सतीश चव्हाण आणि प्रशांत बंब एकमेकांविरोधात मैदानात होते. चव्हाण हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, तर बंब भाजपकडून निवडणूक लढले होते. त्या निवडणुकीपासून दोघांमधील राजकीय संघर्षाची चर्चा आहे. आता शिक्षकांच्या मुद्द्यावरून पत्रांच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.


