(नाशिक / प्रतिनिधी)
आगामी काळ कठीण जाणारा असून अप्रिय गोष्टी, अराजकता, महायुद्धाचे ढग आणि नैसर्गिक आपत्ती यापासून समस्त जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी सेवेकर्यांनी जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवा स्वामी महाराज आणि भगवतीच्या चरणी समर्पित करावी अशी स्पष्ट आज्ञा अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी केली.
राष्ट्र, समाज आणि धर्महितासाठी तसेच मानव जातीच्या कल्याणासाठी सेवामार्गातर्फे शनिवारी (२० सप्टेंबर) घेण्यात आलेल्या सामुदायिक श्रीमद् गुरुचरित्र पारायणात ५५१ सेवेकर्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी गुरुमाऊली श्री. मोरे यांनी सेवेकऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, अब्जचंडीची सेवा हीच मुळात विश्वशांती,राष्ट्रहित आणि मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. आजवर ९१ कोटी पाठ वाचन झाले आहेत. अद्याप ही सेवा अपूर्ण आहे. त्यामुळे येणाऱ्या कठीण काळात जीवसृष्टीचे रक्षण होऊन वित्तहानी होऊ नये आणि राष्ट्राचे देखील कल्याण व्हावे या हेतूने ही सेवा सेवेकर्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी तसेच बारा लक्ष श्री स्वामी समर्थ जप लिहिण्याची सेवाही पूर्ण करून श्रींच्या चरणी समर्पित करावी असे आवाहन त्यांनी केले.
नवरात्रीमध्ये भगवतीच्या सेवेचे महत्व..
नवरात्रीमध्ये भगवतीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या कुलस्वामिनीची सर्वोच्च सेवा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. या काळात जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीचे पाठ सामुदायिक अथवा वैयक्तिक करावेत आणि शक्य होईल तेव्हा आपल्या कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जाऊन वर्षातून एकदा तिचा मानसन्मान करावा म्हणजे आपल्या कुटुंबावर तिथे कृपाछत्र राहते असे गुरुमाऊलींनी नमूद केले.
समस्त सेवेकर्यांनी केले पितृतर्पण..
गुरुचरित्र पारायणाला आलेल्या सेवेकऱ्यांनी पारायणापूर्वी पितृ पंधरवड्यानिमित्त सामुदायिकपणे देव ,ब्रह्म, ऋषी आणि आणि पितृतर्पण ही सेवा समर्पित केली. याज्ञिकी विभागाचे सेवेकरी श्री दीपक मुळेशास्त्री, श्री ठाकूरशास्त्री यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या पारायणामध्ये वाचक म्हणून सौ.सुनीता काकड यांनी सेवा रुजू केली. यावेळी गुरुपुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे ,श्री नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते. गाणगापूर येथील दत्तपीठावर २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मासिक सत्संग होणार असून तेथे सेवेकर्यांनी जपाच्या वह्या जमा कराव्यात असे सर्वांना कळविण्यात आले.

