( नवी दिल्ली )
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस, 1 जानेवारी 2026 असून याच दिवशी देशातील सरकारी मालकीच्या पेट्रोलियम कंपन्यांनी तेल व वायू क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या किमतींमध्ये बदल केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, विमान वाहतूक क्षेत्र तसेच सामान्य ग्राहकांवर होणार आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला महागाईचा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या असून, त्याचवेळी विमान टर्बाइन इंधन (ATF) तसेच CNG-PNG च्या दरात कपात केली आहे.
व्यावसायिक LPG सिलिंडर महाग
1 जानेवारी 2026 पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सुमारे 111 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी हे नवे दर लागू केले आहेत. याचा फटका विशेषतः हॉटेल्स, ढाबे, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिकांना बसणार आहे.
डिसेंबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत केवळ 1 रुपयांची नाममात्र घट करण्यात आली होती. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही दरवाढ लागू झाल्याने व्यावसायिक क्षेत्रात नाराजी व्यक्त केली जात आहे.
घरगुती गॅस ‘जैसे थे’
दिलासादायक बाब म्हणजे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती ग्राहकांसाठी गॅसचे दर सध्या स्थिर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने PNG गॅसच्या किमतीत कपात केली असून ATF दरातही घट करण्यात आल्याने विमान कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तेल सार्वजनिक उपक्रमांकडून दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी, ATF व गॅस दरांचा आढावा घेतला जातो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेले हे बदल महागाई, वाहतूक खर्च आणि सेवा क्षेत्रावर परिणाम करणारे ठरणार आहे

