(रत्नागिरी /प्रतिनिधी)
भाटे-पावस मार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने अपघात प्रतिबंधासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘Operation TAPE For Safe’ अंतर्गत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी भाटे-पावस रोडची प्रत्यक्ष पाहणी केली. अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाटे-पावस मार्गावरील वाहतूक व्यवस्था, अपघातांची संभाव्य कारणे आणि धोकादायक ठिकाणांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. पाहणीदरम्यान अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. रस्त्यावरील संभाव्य धोकादायक ठिकाणी आवश्यक सुधारणा करणे, वाहनचालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी मार्गदर्शन करणे तसेच अपघाताची शक्यता असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. ‘अपघात घडल्यानंतर कारवाई’ऐवजी ‘अपघात होऊच नये यासाठी प्रतिबंध’, या भूमिकेतून पोलीस दलाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पाहणीदरम्यान सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस दलाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा केवळ कार्यालयीन पातळीवर आढावा न घेता पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः अपघातप्रवण मार्गांवर जाऊन परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्यामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजनांना प्रत्यक्ष अंमलबजावणीची जोड मिळत आहे. भाटे-पावस मार्गाच्या पाहणीनंतर आता संबंधित यंत्रणांकडून सुचविण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी कितपत वेगाने होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे वाहनचालकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

