(रत्नागिरी / वार्ताहर)
मोबाईलमध्ये अॅप डाउनलोड करून स्वातंत्र्यदिनाचे शुभेच्छा कार्ड तयार करणे रत्नागिरीतील एका सेवानिवृत्ताला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी या अॅपचा गैरफायदा घेत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ८ लाख ६२ हजार ४०० रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुहास दिगंबर सोहनी (वय ६१, रा. बी/१९, सोहम अपार्टमेंट, गोकुळ डेअरीजवळ, टिळक आळी, रत्नागिरी) हे सेवानिवृत्त आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड केले होते. या अॅपच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांसाठी एक कार्ड तयार केले. कार्ड तयार केल्यानंतर त्यांनी संबंधित अॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉल केले.
मात्र, त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाल्याचे समोर आले. अज्ञात सायबर भामट्यांनी त्यांच्या इंडसइंड बँकेतील मुदत ठेवीच्या खात्यातून एकूण ८ लाख ६२ हजार ४०० रुपये त्यांच्या बचत खात्यात वळवले. त्यानंतर बचत खात्यात आलेली संपूर्ण रक्कम ऑनलाइन पद्धतीने लांबवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील इंडसइंड बँक शाखेच्या हद्दीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची तक्रार दिल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुहास सोहनी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. २८१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे अनोळखी किंवा संशयास्पद अॅप मोबाईलमध्ये डाउनलोड करताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. शुभेच्छा कार्ड, फोटो एडिटिंग किंवा अन्य सुविधांच्या नावाखाली डाउनलोड केलेल्या अॅपला बँकिंगशी संबंधित अनावश्यक परवानग्या देणे टाळावे, तसेच मोबाईलमध्ये संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधावा.

