(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे काम करणारे युवा नेतृत्व रूपेश जाधव यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. रत्नागिरी तालुकाध्यक्ष म्हणून संघटनात्मक बांधणी आणि विविध सामाजिक प्रश्नांवर केलेल्या कामाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रत्नागिरी विधानसभा उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
रूपेश जाधव गेल्या काही वर्षांपासून मनसेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, कामगार आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी रत्नागिरी तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचा पाठपुरावा करणे, ही त्यांच्या कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात.
रोजगार, कामगार आणि सामाजिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका
रूपेश जाधव यांनी रोजगार मेळावे, रक्तदान शिबिरे, कामगारांचे प्रश्न, रुग्णांना शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयांमधून मदत मिळवून देणे, तसेच रुग्णालयांची देयके कमी करण्यासाठी पाठपुरावा करणे अशा विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.
कोरोना महामारीच्या काळात आयसीयू बेड, रुग्णवाहिका तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चिपळूणमधील पूरपरिस्थितीतही मदतकार्य करण्यात त्यांनी सहभाग घेतला. विविध शासकीय आस्थापनांना सामाजिक उपयोगाच्या वस्तू उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
प्रशासनाशी समन्वय साधत विविध प्रश्नांचा पाठपुरावा
नोकरी, शाळा-कॉलेज प्रवेश, सीएनजीचा अपुरा पुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या स्थानिक प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. कोरोना काळात म्युकरमायकोसिसवरील औषधांचा जिल्हा रुग्णालयात पुरवठा व्हावा, यासाठी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा वाहतुकीसंदर्भातील तक्रारी, मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य मिळावे, तसेच रत्नागिरीत मत्स्यविज्ञान विद्यापीठ स्थापन करावे, अशा विविध विषयांवर आंदोलन आणि पाठपुराव्यात त्यांनी पुढाकार घेतला.
सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सहभाग
सामाजिक आणि राजकीय कामासोबतच सांस्कृतिक उपक्रमांमध्येही रूपेश जाधव सक्रिय राहिले आहेत. ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या मराठी चित्रपटांचे मोफत शो, दहीहंडी उत्सव आणि अन्य सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांनी सहभाग घेतला.
अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्याचे नियोजन, रत्नागिरी विधानसभा संपर्क कार्यालयाची उभारणी आणि पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचीही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दखल घेतली जात आहे.
Gen Z तरुणांना मनसेशी जोडण्यावर भर
नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार रूपेश जाधव यांनी व्यक्त केला आहे. शहरासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मजबूत संघटनात्मक मोट बांधण्यासोबतच तरुणाईला पक्षाशी जोडण्यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेषतः Gen Z पिढीशी संबंधित शिक्षण, रोजगार आणि भविष्यातील संधींचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचा त्यांचा मानस आहे. तरुणांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देत रत्नागिरीत मनसेचा प्रभाव वाढविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकाध्यक्ष म्हणून केलेल्या संघटनात्मक कामाचा अनुभव आणि सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय भूमिका लक्षात घेता, रत्नागिरी विधानसभा उपजिल्हाध्यक्ष म्हणून रूपेश जाधव यांच्यासमोर पक्ष संघटना विस्तारण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

