(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस येथे हजरत शेख महंमद पीर यांच्या उरूसाचा प्रारंभ शुक्रवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. हजरत महंमद पीर यांच्या समाधीला २२५ वर्षांचा परंपरेचा वारसा लाभला असून, हा उरूस दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो.
उरूसाच्या पहिल्या दिवशी, रात्री १०.३० वाजता मिरवणुकीनंतर समाधीवर चंदन चढवून धार्मिक विधींचा शुभारंभ केला जाणार आहे.
५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता समाधीवर सामूहिक पद्धतीने महावस्त्र (गिलाफ) परिधान करण्याचा सोहळा होईल.
६ नोव्हेंबर रोजी, हजरत महंमद पीर दर्गा, पावस आणि इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
उरूसाचा सांगता समारंभ भाविकांना दर्शनासोबत महाप्रसाद वितरणाने रात्री ७.३० ते १० या वेळेत होईल. (पावसाचे वातावरण अनुकूल नसेल तर महाप्रसादाचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल.)
हजरत महंमद पीर हे जागृत देवस्थान मानले जाते. नवस फेडण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी सर्व धर्मीय भाविक दरवर्षी पावस येथे मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. भाविकांच्या सोयीसाठी चहा, थंड पेय, खाद्यपदार्थ आणि प्रसाद साहित्याची दुकाने सज्ज होत असून, तीन दिवस परिसरात उत्सवी वातावरण अनुभवता येते.
या धार्मिक सोहळ्याचे व्यवस्थापन शेख महंमद पीर दर्गा ट्रस्ट पावस हे पाहत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष फैअली हुसेनखान फडनाईक, दाऊद महामूद मुजावर आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांनी या उरूसात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

