(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
घराकडे परतणारा प्रत्येक प्रवास सुखरूप व्हावा, अशीच प्रत्येक कुटुंबाची अपेक्षा असते. मात्र, नियतीने एका क्षणात सर्व काही हिरावून घेतले. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा येथे बुधवारी (१५ जुलै) सकाळी झालेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. भरधाव वेगाने येणारी क्रेटा कार रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर मागून आदळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
ही हृदयद्रावक घटना बुधवारी, १५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे पावणेसात वाजण्याच्या दरम्यान लांजा तालुक्यातील अद्वैत पेट्रोल पंपासमोर मुंबई-गोवा महामार्गावर घडली. गोव्याहून मुंबईकडे निघालेली क्रेटा कार (MH 01 CP 8021) रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरला (MH 05 EL 3877) भरधाव वेगात जाऊन पाठीमागून धडकली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातात युवक महम्मद इरफान कुरेशी, यास्मिन इरफान कुरेशी, फिजा अनस कुरेशी आणि क्रेटा कार चालक मुस्ताफा अल्ताफभाई काफी यांचा जागीच मृत्यू झाला. तर महंम्मद अनस इरफान कुरेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त सर्वजण मुंबईतील नागपाडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा पूर्ण करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण काय, उभ्या डंपरची स्थिती काय होती आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या भीषण दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर उभी असलेली जड वाहने, भरधाव वेग आणि क्षणभराचा दुर्लक्ष यांचा परिणाम किती भयावह असू शकतो, याची ही घटना वेदनादायी आठवण करून देणारी ठरली आहे.
चार जिवांचे अकाली निधन आणि महंम्मद अनस इरफान कुरेशी या तरुणाची सुरू असलेली मृत्यूशी झुंज यामुळे नागपाडा परिसरासह संपूर्ण कोकण हळहळ व्यक्त करत आहे. काही क्षणांपूर्वी एकत्र प्रवास करणारे कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाले. या अपघाताने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणले असून, “प्रवास सुरक्षित असावा” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगराबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की धडकेनंतर कारमधील प्रवासी अक्षरशः दूरवर फेकले गेले. घटनास्थळावरील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. गंभीर स्वरूपाच्या जखमांमुळे चारही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरात रक्ताचे डाग आणि मृतदेहाचे अक्षरशः तुकडे रस्त्यावर विखुरलेले असल्याने उपस्थित नागरिकही हादरून गेले होते. एका मृत महिलेचा बुटामधील राहिलेल्या भागाचा तुकडा होऊन ‘बुटात पाय’ अशा पद्धतीने रस्त्यावर पडलेला होता. अपघातातून जीव वाचलेला तरुण काही अंतरावर जखमी अवस्थेत पडलेला होता. समोर आपल्या कुटुंबीयांची अवस्था पाहून तो पूर्णपणे सैरभैर झाला होता. स्थानिक नागरिकांनी त्याला धीर देत तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या हृदयद्रावक दुर्घटनेने घटनास्थळी उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले आणि काही काळ संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
डंपर थोडा सुद्धा बाजूला सरकला नाही….
अपघातानंतर समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित डंपर गेल्या दोन दिवसांपासून महामार्गाच्या कडेला बंद पडलेल्या अवस्थेत उभा होता. मात्र, तो पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेर पूर्णपणे न लावता पांढऱ्या पट्ट्याच्या अगदी मधोमध उभा ठेवण्यात आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीं सांगत आहे. हा डंपर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीचा असल्याचेही समोर आले आहे. डंपरमध्ये बारीक खडी भरलेली असल्याने भीषण धडकेनंतरही डंपर थोडा सुद्धा बाजूला सरकला नसून त्याचे विशेष नुकसान देखील झाले नाही. मात्र, अपघातग्रस्त क्रेटा कारचा अक्षरशः चुराडा झाला.
घटनास्थळावरील छायाचित्रांवरून डंपरच्या मागील बाजूस आवश्यक असलेले रिफ्लेक्टर, इंडिकेटर, रेडियम मार्किंग किंवा मागील सुरक्षा गार्ड स्पष्टपणे दिसत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, महामार्गावर वाहन बंद पडल्यास इतर वाहनचालकांना सावध करण्यासाठी ठराविक अंतरावर इशारा फलक, रिफ्लेक्टर कोन किंवा ब्लिंकर दिवे लावणे अपेक्षित असते. मात्र, घटनास्थळी अशा प्रकारची कोणतीही पूर्वसूचना देणारी व्यवस्था दिसून आली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.

