( अमरावती )
उद्योगमंत्री उदय सामंत यांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. शुक्रवारी नागपूर आणि अमरावती दौरा आटपून उदय सामंत हे अमरावतीच्या बेलोरा विमातळावर छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी पोहोचले. मात्र, वैमानिकाने विमान टेक ऑफ करण्यास नकार दिला. वैमानिकाने काही महत्वाचे नियम सांगितल्यानंतर मंत्री सामंत यांना समृद्धी महामार्गाने कारद्वारे छत्रपती संभाजीनगरला जावे लागले. हे प्रकरण पोलिसांकडे गेले असून तपास सुरू झाला आहे.
मंत्री सामंत हे उद्योगभरारी कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. सामंत यांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील एका एअर कंपनीचे एअरक्रॉफ्ट नेमण्यात आले होते. नागपूरहून कार्यक्रम झाल्यानंतर सामंत हे अमरावतीला पोहोचले. छत्रपती संभाजीनगर येथे 6 वाजता उद्योगभरारी कार्यक्रम होता. त्यामुळे अमरावतीत कार्यक्रम आटोपल्यानंतर सामंत दुपारी 4.30 वाजता अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर पोहोचले.
6 वाजता कार्यक्रम असल्यानं 5 वाजता टेकऑफ करणे आवश्यक होते. पण, मंत्री सामंत हे विमानात बसताना वैमानिक गगन अरोरा यांनी कुठलीही सूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले.
आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमासाठी पोहोचणे आवश्यक असून टेक ऑफ करावे, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली. मात्र, काही नियम सांगत वैमानिकाने ‘टेक ऑफ’ करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर मंत्री सामंत यांनी थेट एअर कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला. परंतु, मालकाने देखील कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
अखेर सामंत यांनी कारने समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर गाठले. तसेच, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता विमानाने मंत्र्यांशिवाय विमान टेक ऑफ केले, असे सांगितले जाते. याप्रकरणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलिसांत तक्रार दिली आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
अमरावतीचे शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख अरूण पडोळे यांनी कंपनीचे मालक आणि वैमानिकाचं वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. “याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. उद्योगमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिली आहे,” असं अरूण पडोळे यांनी सांगितलं.