(देवळे / प्रकाश चाळके)
अतिवृष्टीमुळे आंबा घाट परिसरात दरडी कोसळण्यासह रस्त्याला भेगा पडून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे व्यापारी वर्गासह परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग किंवा मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू करता येईल का, याबाबत आज महत्त्वाची पाहणी होणार आहे.
आमदार भैय्या सामंत हे आज दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आंबा घाटाची पाहणी करणार आहेत. या दौऱ्यात पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने व्यापारी वर्गासाठी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने कोणता पर्याय उपलब्ध होऊ शकतो, याबाबत या पाहणीत आढावा घेतला जाणार आहे.
विशेषतः आंबा घाटातून अवजड वाहनांना परवानगी देणे शक्य नसल्यास, सुरक्षिततेच्या निकषांनुसार चारचाकी आणि सहाचाकी छोट्या मालवाहू वाहनांना मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू करता येईल का, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. रस्त्याची सद्यस्थिती, भेगा, दरडीचा धोका आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
साखरपा, कोंडगाव आणि दाभोळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांकडून व्यापारी वर्गाच्या मालवाहतुकीच्या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भैय्या सामंत यांची आजची आंबा घाट पाहणी महत्त्वाची मानली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी वर्गाची होणारी गैरसोय लक्षात घेता, आंबा घाटातून सुरक्षिततेच्या निकषांनुसार छोट्या मालवाहू वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत आज काही सकारात्मक निर्णय होतो का, याकडे संगमेश्वर, देवरुख, साखरपा आणि पाली परिसरातील व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

