(संगमेश्वर / एजाज पटेल)
तालुका वैद्यकीय विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुरंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता असतानाही, येथील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्याची दोन वर्षांपूर्वी कोंड उमरे प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कामगिरी बदल’ म्हणून बदली करण्यात आली आहे. आजही त्या कर्मचारी महिलेची बदली रद्द करण्यात आलेली नाही, हे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, “जखम पायाला आणि मलम डोक्याला” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. कारण, एका बाजूला रुग्णसंख्येचा ताण वाढत असताना दुसरीकडे रिक्त पदे भरली जात नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या येत आहेत, आणि रुग्णसेवाही खोळंबत आहे.
विस्तारित सेवा क्षेत्र, पण अपुरी मनुष्यबळ व्यवस्था
संगमेश्वर–देवरुख मुख्य मार्गावर वसलेले बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र सुमारे २५ ते ३० गावांचा कार्यक्षेत्र समाविष्ट करते. तेर्ये, नावडी आणि धामणी येथे या केंद्राची उपकेंद्रे कार्यरत आहेत. विस्ताराने मोठ्या असलेल्या या क्षेत्रात आरोग्यसेवा देणारे हे केंद्र हेच एकमेव शासकीय उपचार केंद्र आहे, ज्यावर स्थानिक रुग्णांचा पूर्ण विश्वास आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी वाणवा आहे. त्यामुळे नियमित आरोग्य सेवा, गावोगाव फिरती आरोग्य तपासणी, जनजागृती उपक्रम हे सारेच प्रभावित झाले आहेत. ग्रामीण भागांपर्यंत शासनाची आरोग्यसेवा पोहोचवण्याचे ध्येयच यातून अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
तालुका आरोग्य विभागाकडून दुर्लक्षच
स्थानिक नागरिक आणि रुग्ण यांच्याकडून वारंवार रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र या मागण्यांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष कायम असून, बुरंबी सारख्या केंद्रातील कर्मचारी इतर ठिकाणी कामगिरीवर पाठवले जात आहेत. ही बाब केवळ व्यवस्थापनातील हलगर्जीपणाच नव्हे, तर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची क्रूर थट्टा करण्यासारखे आहे. तर कमी मनुष्यबळामुळे इतर कर्मचारी अतिरिक्त कामाचा ताण सहन करत आहेत.
तातडीने रिक्त पदे भरण्याची गरज
बुरंबी आरोग्य केंद्रातील ही स्थिती पाहता, रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत, आणि कर्मचाऱ्यांची अकार्यक्षम कामगिरी बदली व्यवस्था पुन्हा तपासली पाहिजे. अन्यथा तालुकास्तरीय आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही

