(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील देवरुख येथे महसूल विभागाच्या ताब्यात ठेवलेला तब्बल १९ लाखांचा ट्रक चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास ते १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. या संदर्भात मंडळ अधिकारी विलास यशवंत हिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी ट्रक मालक शरणबसप्पा धरमण्णा तळवार (रा. कलंहागरगा, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात चोरीचा गुन्हा (कलम ३७९) दाखल केला आहे.
१६ सप्टेंबर रोजी महसूल विभागाने कारवाई करताना लांजा-दाभोळे रस्त्यावर सकमवाडीजवळ ट्रक (क्र. KA-32D-6134) जांभ्या दगडाने ओव्हरलोड अवस्थेत आढळला होता. हा ट्रक ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी तो देवरुख येथील शिवाजी चौकाजवळ वडाच्या पाराजवळ उभा करण्यात आला होता. जप्त केलेल्या ट्रकमध्ये ५.७२ ब्रास जांभा दगड असून त्याची किंमत सुमारे १७ हजार १६० रुपये आहे. तर ट्रकाची किंमत तब्बल १९ लाख रुपये असल्याचे महसूल विभागाने नमूद केले आहे.
महसूल विभागाच्या ताब्यातूनच चोरी
या ट्रकावरील कारवाई सुरू असतानाच, कोणतीही परवानगी न घेता ट्रक मालक शरणबसप्पा तळवार याने लबाडीच्या इराद्याने जप्त वाहन पळवून नेले. महसूल विभागाच्या ताब्यात ठेवलेल्या वाहनावरच मालकाने हात साफ केल्याने प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिक पातळीवर या प्रकाराची मोठी चर्चा
या प्रकाराची माहिती मिळताच महसूल विभागाने १९ सप्टेंबर रोजी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. महसूल विभागाच्या जप्त वाहनांच्या सुरक्षेबाबत उद्भवलेल्या या घटनेने अधिकाऱ्यांचीही चांगलीच पंचाईत झाली आहे. स्थानिक पातळीवर या प्रकाराची मोठी चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इतक्या मोठ्या किमतीचे वाहन चोरट्यांच्या (किंवा स्वतःच मालकाच्या) तावडीतून निसटल्याची घटना अभूतपूर्व मानली जात आहे.

