(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर-देवरुख-साखरपा-कोल्हापूर या राज्य मार्गाची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था कायम असून, रस्त्यावरील खड्डे आणि निकृष्ट दुरुस्तीच्या कामांमुळे हा मार्ग सातत्याने चर्चेत आहे. आता संगमेश्वर-देवरुख मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामाच्या पद्धतीवरून वाहनचालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. डांबरी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी डांबराऐवजी सिमेंट, खडी आणि ग्रीटच्या मिश्रणाचा वापर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणी तीन दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
संगमेश्वर-देवरुख मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत हाती घेतले आहे. लोवले परिसरात शुक्रवारी तीन ठिकाणी खड्डे सिमेंटच्या मिश्रणाने भरण्यात आले. हे मिश्रण सुकण्यासाठी वाहनांची ये-जा होऊ नये म्हणून रस्त्यावर लांब अंतरापर्यंत दगड, झाडांचे बुंधे आणि फांद्या टाकण्यात आल्या. दोन्ही बाजूंना धोक्याचे फलक लावण्यात आले असून, या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
मात्र, खड्डे भरल्यानंतर तीन दिवस उलटूनही हे अडथळे कायम असल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. सिमेंटचे मिश्रण सुकण्यासाठी एवढा कालावधी आवश्यक आहे का, तसेच कामाच्या ठिकाणी वाहतूक सुरक्षितपणे नियंत्रित करण्यासाठी कोणती नियमावली आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या एकेरी वाहतुकीसाठी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरवर्षी दुरुस्ती, तरीही खड्ड्यांची समस्या कायम
या मार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न यंदाचाच नसून गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. यावर्षी मे महिन्यात गतवर्षी खड्डे पडलेल्या ठिकाणी जाडी खडी टाकून मजबुतीकरण करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता प्रवासासाठी सुरक्षित राहील, असा दावा बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडून करण्यात आला होता. मात्र, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जून महिन्यात पाऊस काही काळ थांबल्यानंतर पूर्वीच्या खड्ड्यांमध्ये तळाला डांबर न टाकता वरच्या बाजूने हॉटमिक्सचा माल टाकण्यात आल्याचा आरोप वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात हा माल वाहून गेल्याने रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
दरवर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असतानाही रस्त्याची अवस्था सुधारत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. कामाचा दर्जा आणि रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून वस्तुस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
संगमेश्वर-देवरुख प्रवास नकोसा
संगमेश्वर ते देवरुख हे अवघे सुमारे २५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या एक तासापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे वाहनचालक सांगतात. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच लोवले परिसरातील तीन ठिकाणी रस्त्यावर अडथळे उभारून तीन दिवसांपासून एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी, तसेच रस्त्यावरील अडथळे तातडीने दूर करून सुरक्षित वाहतूक व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“संगमेश्वर-साखरपा राज्य मार्गावरील खड्डे वाहनचालकांना आता सवयीचे झाले आहेत, असे बहुधा बांधकाम विभागाला वाटत असावे. मात्र, दरवर्षी दुरुस्ती करूनही रस्त्याची परिस्थिती सुधारत नसेल तर या कामाच्या दर्जाची आणि खर्च होणाऱ्या निधीची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनीही या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे.”
— रवींद्र हळबे, माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवणे, ता. संगमेश्वर

