(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अडीच महिन्यांच्या मान्सून मासेमारी बंदीनंतर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून अधिकृतपणे मासेमारी हंगामाला सुरुवात झाली. मासेमारीसाठी बंदरे सज्ज झाली असली तरी पहिल्याच दिवशी अपेक्षित प्रमाणात नौका समुद्रात उतरल्या नाहीत. खलाशांची कमतरता, मतलई वाऱ्यांची स्थिती, डिझेलचे वाढलेले दर तसेच नौकांच्या दुरुस्तीचा वाढता खर्च यामुळे जिल्ह्यातील ५० टक्क्यांपेक्षाही कमी यांत्रिक व पारंपरिक नौका खोल समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या.
शासनाने १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत लागू केलेली मासेमारी बंदी संपल्यानंतर मिरकरवाडा, राजीवडा, साखरतर, काळबादेवी, वरवडे, जयगड, पूर्णगड, साखरीनाटे, हर्णे आणि दाभोळ या प्रमुख बंदरांवरील हालचालींना वेग आला आहे. बंदीच्या काळात किनाऱ्यावर विसावलेल्या नौका पुन्हा समुद्रप्रवासासाठी सज्ज करण्यात आल्या. मात्र, अनेक नौकांची इंजिने, जाळी आणि अन्य मासेमारी साहित्याची दुरुस्ती अद्याप पूर्ण झालेली नसल्याने काही मच्छीमारांनी समुद्रात उतरण्याऐवजी आणखी काही दिवस प्रतीक्षा करण्याची भूमिका घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ४२३ यांत्रिक आणि ५१२ बिगरयांत्रिक अशा एकूण ३ हजार ९३५ नौका आहेत. यापैकी पहिल्या दिवशी ५० टक्क्यांपेक्षाही कमी यांत्रिक नौका मासेमारीसाठी समुद्रात उतरल्या. उर्वरित नौकांची दुरुस्ती, इंजिनची कामे, जाळ्यांची तयारी आणि इतर आवश्यक कामे अद्याप सुरू आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत या नौकाही टप्प्याटप्प्याने समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे. पावसाळी बंदीनंतरचा मासेमारी हंगामाचा पहिला आठवडा मच्छीमारांसाठी नेहमीच चाचपणीचा असतो. समुद्राची स्थिती, वाऱ्यांचा वेग, मासळीची उपलब्धता आणि हवामानाचा अंदाज घेत मच्छीमार पुढील नियोजन करतात. त्यामुळे येत्या आठवड्यात समुद्रात उतरणाऱ्या नौकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बंदरांवर पुन्हा गजबज
अडीच महिन्यांपासून किनारपट्टीवरील मासेमारी बंदरांवर असलेली शांतता आता हळूहळू दूर होऊ लागली आहे. मासेमारी हंगाम सुरू झाल्याने बंदर परिसरात पुन्हा वर्दळ वाढू लागली आहे. पानटपऱ्या, रिक्षा, टेम्पो, हॉटेल्स, बर्फ कारखाने तसेच मासे विक्रीच्या व्यवसायाला पुन्हा चालना मिळू लागली आहे. त्यामुळे मासेमारीसोबतच त्यावर अवलंबून असलेल्या किनारपट्टीवरील छोट्या-मोठ्या व्यवसायांमध्येही नव्या हंगामाची लगबग सुरू झाली आहे.

