(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे त्यांच्या केंद्रातील संभाव्य जबाबदारीबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चांना खुद्द फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे. ‘मला दिल्लीत पाठवावे, असे अनेकांना वाटते. मात्र त्या सगळ्यांना मी सांगतो की, मी मुंबईतच आहे,’ असे स्पष्ट करत फडणवीस यांनी केंद्रात जाण्याची शक्यता पुन्हा एकदा फेटाळून लावली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या संघटनात्मक चमूची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवशी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने त्यांच्या दिल्लीवारीकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात होते. मात्र, फडणवीस यांनी आपण महाराष्ट्राची जबाबदारी सोडून केंद्रात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
‘मी महाराष्ट्रात आहे. जनतेने आणि नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आहे आणि ती करतच राहणार आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले. आपल्या दिल्ली दौऱ्यावरून सुरू असलेल्या चर्चेवर त्यांनी मिश्कील भाष्यही केले. ‘मी दिल्लीत असलो तरी चर्चा होते आणि मुंबईत असलो तरी चर्चा होते. अनेक रिकामटेकड्या लोकांना माझ्याबद्दल चर्चा करायला आवडते. त्यामुळे त्यांना आनंद घेऊ द्या,’ असे ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून राजकीय चर्चेला सुरुवात केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी ‘ज्याला जे तारे तोडायचे आहेत, जे फुगे उडवायचे आहेत, जी पतंग उडवायची आहे ती उडवू द्या,’ असे म्हणत या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे संकेत दिले.
दरम्यान, फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य आणि निधी मिळवणे हा होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महामार्ग, रेल्वे, मेट्रो, उत्तन-विरार कॉरिडॉर आणि नदीजोड प्रकल्पांसह केंद्राच्या सहकार्याने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. या प्रकल्पांना केंद्राकडून आवश्यक मदत मिळवून वेग देण्याचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचीही भेट घेतली. सुमारे ५५ हजार कोटी रुपयांच्या उत्तन-विरार कॉरिडॉरसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी अर्थात जायका यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रकल्पाची आर्थिक व्याप्ती मोठी असल्याने जायकासोबत आणखी एक-दोन बहुपक्षीय वित्तीय संस्थांना सहभागी करून घेऊन संपूर्ण निधी उभारता येईल का, याचा प्रयत्न करण्याची सूचना निर्मला सीतारामन यांनी केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या सूचनेला महाराष्ट्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील काळात त्यावर काम केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठीही केंद्राकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी आणखी सुमारे आठ हजार एकर जमीन संपादित केली जात असून, त्यासाठी केंद्राने आर्थिक सहभाग द्यावा, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. दिल्ली-नागपूर कॉरिडॉरवर सावनेर येथे सुमारे सहा हजार एकर क्षेत्रात औद्योगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच मुंबई-बंगळुरू कॉरिडॉरवर एमआयडीसीची औद्योगिक वसाहत उभारण्याची मागणीही केंद्रासमोर मांडण्यात आली आहे. केंद्राच्या संबंधित योजनांमध्ये महाराष्ट्राला जास्तीत जास्त औद्योगिक पार्क मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रो-३च्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या पुणे मेट्रो-३चे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या चाचण्या सुरू आहेत. नव्या धोरणांतर्गत देशातील पहिली सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी पद्धतीची मेट्रो म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध पर्यावरण आणि वनविषयक प्रकल्पांच्या मंजुऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रलंबित आहेत. या प्रलंबित मंजुऱ्यांची माहिती पर्यावरणमंत्र्यांना देऊन त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. केंद्राकडून या प्रकरणांमध्ये सकारात्मक सहकार्याचे आश्वासन मिळाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
एकीकडे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी केंद्राकडून निधी आणि मंजुऱ्यांचा पाठपुरावा करण्यासाठी फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला, तर दुसरीकडे त्यांच्या केंद्रातील संभाव्य भूमिकेबाबत सुरू झालेल्या चर्चांवर त्यांनी स्वतःच स्पष्टीकरण दिले आहे. ‘महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि मी ती प्रामाणिकपणे पार पाडत राहणार आहे,’ या फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या दिल्लीतील राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

