(नवी दिल्ली)
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाचे गंभीर पडसाद आता आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवर उमटू लागले आहेत. ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘सेट्टेबेलो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना बुधवारी समन्स बजावले.
या जहाजावर एकूण 24 भारतीय कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी 21 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असून तीन भारतीय कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेमुळे भारत सरकार सतर्क झाले असून परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (अमेरिका) नागराज नायडू यांनी अमेरिकेच्या चार्ज डी’अफेअर्स यांना बोलावून या हल्ल्याबाबत भारताचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये सुरक्षित नौकानयन, व्यापारी जहाजांचे संरक्षण आणि तणाव कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज अधोरेखित केली.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ओमानच्या किनाऱ्याजवळ ‘सेट्टेबेलो’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून शोध आणि बचाव मोहिमेसाठी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे.”
मंत्रालयाने पुढे म्हटले की, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे तात्काळ थांबले पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार जलमार्गांमधील मुक्त आणि निर्बाध व्यापार पुन्हा सुरळीत करण्याची आवश्यकता भारताने अधोरेखित केली.
युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) च्या माहितीनुसार, ओमानमधील सोहारच्या ईशान्येस सुमारे 37 किलोमीटर अंतरावर एका टँकरला आग लागली होती. जहाजाच्या इंजिन रूममध्ये लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सोमवारी पलाऊ-ध्वजांकित ‘MT Marivex’ या टँकरवरही हल्ला झाला होता. त्या जहाजावरील 24 भारतीय कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली होती. या बचाव मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान सरकारचे आभार मानले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या सोहार पोर्टपासून सुमारे 20 नॉटिकल माईल दूर समुद्रात ही घटना घडली. पलाऊ देशाचा झेंडा असलेल्या ‘सेटोबेलो’ नावाच्या केमिकल आणि तेलाच्या टँकरवर हा हल्ला झाला. जहाज पुढे जात असताना अचानक जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, इंजिन रूमला आग लागली. त्यामुळे जहाजावर एकच गोंधळ उडाला. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. या दुर्घटनानंतर जहाजावरून तातडीने ‘डिस्ट्रेस कॉल’ म्हणजे मदतीची मागणी केली गेली. हे सिग्नल मिळताच ओमानची नेव्ही आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजन्सी तातडीने सक्रिय झाल्या आणि बचावकार्य सुरू केलं.
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक व्यापार मार्गांवर मोठा धोका निर्माण झाला असून भारताने सर्व संबंधित देशांना शांतता, स्थैर्य आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे.

