(सिंधुदुर्ग / दोडामार्ग )
दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथे तिलारी नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी ५.१५ ते ५.३० या दरम्यान काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नदीवरील कॉजवे ओलांडत असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या तीव्र प्रवाहात छत्तीसगडमधील २५ वर्षीय तरुण आणि सहा वर्षांचा चिमुकला वाहून गेला. अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी (वय २५) आणि रेगण दिलीप बडा (वय ६) अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत दोघांचाही शोध लागला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मूळचे छत्तीसगड येथील असलेले अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी हे रोजगाराच्या निमित्ताने घोटगेवाडी येथे वास्तव्यास होते. सोमवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ते सहा वर्षांच्या रेगणला सोबत घेऊन तिलारी नदीवरील कॉजवे ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी नदीच्या पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहाच्या तडाख्यात सापडले. काही क्षणांतच पाण्याच्या प्रवाहाने त्यांना वाहून नेले.
घटनेची माहिती मिळताच कोनाळे गावचे उपसरपंच रत्नाकांत कर्पे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, नदीपात्रात पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने दोघांना वाचवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेलाही घटनेची माहिती देण्यात आली आणि दोघांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
स्थानिक युवकांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने नदीपात्र आणि परिसरात दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली. रात्री उशिरापर्यंत अनुरंजन आणि रेगण यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्याने कुटुंबीयांसह स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
तिलारी नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे कॉजवे ओलांडताना ही दुर्घटना घडल्याने नदीपात्रातील धोकादायक ठिकाणी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. अंधार आणि पाण्याचा वेग यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले असून, पुढील टप्प्यात आज सकाळ पासून प्रशासन आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

