(मुंबई / वृत्तसंस्था)
मुंबईतील नेव्ही नगर, कुलाबा येथील नौदलाच्या निवासी परिसरात १५ ऑगस्ट रोजी नौदल जवान, त्याची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याच्या प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, नौदलातील जवान पुराणमल शंभूलाल मेहरा (३०) याने पत्नी ओमा मेहरा (२८) आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू घातपाती असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुराणमल मेहरा यांचा मृतदेह घराच्या हॉलमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता, तर पत्नी ओमा आणि दोन्ही मुले बेडवर मृतावस्थेत आढळली. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार, दोन महिन्यांच्या मुलीचा उशीने गुदमरवून मृत्यू झाल्याचा संशय आहे. तीन वर्षांच्या मुलगा यश याला विषारी पदार्थ देण्यात आला असण्याची शक्यता असून, याबाबत विषतज्ज्ञांच्या अहवालाची पोलिसांकडून प्रतीक्षा आहे.
घटनेपूर्वी पुराणमल मेहरा याने १४ ऑगस्टच्या रात्री सुमारे ११ वाजता आपल्या वडिलांना “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना…” (आमचे मृतदेह घेऊन जा) असा व्हॉट्सॲप संदेश पाठविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कुटुंबीयांनी हा संदेश १५ ऑगस्टच्या सकाळी पाहिल्यानंतर नौदलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणातील तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. घटनेपूर्वी पुराणमलने स्वतःचा तसेच पत्नीचा मोबाइल फोन फॉरमॅट केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मोबाइलमधील महत्त्वाचा डेटा आणि संभाषणांचा तपशील मिळवण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे. डिलीट करण्यात आलेला डेटा पुन्हा मिळवण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहेत.
पुराणमल मेहरा यांच्यावर नौदलाच्या INHS अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि ते आजारी रजेवर असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. कौटुंबिक आणि आर्थिक तणाव, वैवाहिक वाद तसेच मानसिक अस्वस्थता या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. या घटनांमागील नेमके कारण शोधण्यासाठी कफ परेड पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे.
या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये पुराणमलचा भाऊ, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, घरातील कामासाठी येणारी महिला, त्याचे काही मित्र आणि इतर संबंधित व्यक्तींचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुराणमलच्या स्वभावात झालेला बदल लक्षात आल्यानंतर त्याचे वडील काही महिन्यांपूर्वी मुंबईत आले होते. तसेच पुराणमलचे सासरेही त्याला समजावण्यासाठी मुंबईत आल्याची माहिती आहे.
याच काळात पुराणमल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याचेही तपासात समोर येत आहे. एका वादाच्या वेळी पुराणमलने पत्नीचा मोबाइल जमिनीवर आपटल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कौटुंबिक संबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव आणि त्यानंतर घडलेल्या घटनांचा परस्परसंबंध तपासण्यासाठी पोलिसांकडून या सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.
१५ ऑगस्ट रोजी नेव्ही नगरमधील नौदलाच्या निवासी परिसरात चार जणांचे मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. शनिवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पुराणमल मेहरा यांच्यासह पत्नी आणि दोन्ही मुले मृतावस्थेत आढळली.
कफ परेड व स्थानक पोलिसांनी तातडीने नेव्ही नगरमधील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. जेव्हा पोलिसांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा घरातील दृश्य अत्यंत भयानक होते. पुराणमल मेहरा यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळला, तर त्यांच्या पत्नी ओमा आणि दोन्ही चिमुरडी मुले बेडवर मृतावस्थेत पडलेली होती. प्राथमिक वैद्यकीय आणि पोलीस तपासानुसार पत्नी आणि मुलांना आधी विषारी पदार्थ देण्यात आल्याचे किंवा विष देऊन त्यांची हत्या करण्यात आल्याचे, तर सैनिकाचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून विविध पुरावे जमा केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूबाबत पुराणमल मेहरा यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया कफ परेड पोलिसांकडून सुरू आहे. शवविच्छेदन, विषतज्ज्ञांचा अहवाल, मोबाइलमधील डिलीट डेटा आणि नातेवाईकांसह परिचितांच्या जबाबातून या प्रकरणामागचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

