(नवी दिल्ली)
न्यूमोनिया आणि यूटीआयसारख्या संसर्गजन्य आजारांवर वापरली जाणारी औषधे हळूहळू कमकुवत ठरत असल्याचा इशारा भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ सालच्या शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून नागरिकांना अँटीबायोटिकच्या गैरवापराबाबत गंभीर इशारा दिला.
मन की बात च्या १२९ व्या भागात पंतप्रधानांनी २०२५ मधील देशाच्या प्रमुख उपलब्धींचा आढावा घेतला, तसेच येणाऱ्या २०२६ मधील आव्हाने, संधी आणि विकासाबाबत आपले विचार मांडले. २०२५ हे वर्ष भारतासाठी अभिमानास्पद ठरले असून राष्ट्रीय सुरक्षा, क्रीडा, वैज्ञानिक नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले.
औषधांच्या वापरावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजकाल अनेक लोक कोणताही सल्ला न घेता अँटीबायोटिक औषधे घेत आहेत. एक गोळी घेतली की आजार बरा होईल, अशी चुकीची समजूत लोकांमध्ये पसरत आहे. स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. अँटीबायोटिकचा अतिरेक केल्यास भविष्यात उपचार अधिक कठीण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात २०२५ मधील विविध घडामोडींचा उल्लेख केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत झाल्याचे जगाने पाहिले, असे त्यांनी सांगितले. स्वदेशी वस्तूंविषयी लोकांमध्ये वाढलेला विश्वास, क्रीडा क्षेत्रातील यश, अंतराळ संशोधनातील प्रगती, महाकुंभ, राम मंदिर आणि ७७ वा प्रजासत्ताक दिन यावरही त्यांनी आपले विचार मांडले.
२०२५ मध्ये देशाला काही नैसर्गिक आपत्त्यांचा सामना करावा लागला, हेही पंतप्रधानांनी मान्य केले. मात्र, २०२६ मध्ये देश नवीन आशा, नवीन संकल्प आणि अधिक आत्मविश्वासासह पुढे जाण्यास सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

