(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील मुस्लिम एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी देवरुख येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या बैठकीला देवरुख, कडवई तसेच परिसरातील सुमारे ३५ महिला व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये १९ मुस्लिम एकल महिलांचा समावेश होता.
बैठकीत मुस्लिम एकल महिलांनी आपल्या विविध अडचणी आणि प्रश्न मांडले. महिलांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तसेच ही कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तालुक्यातील बैठकीला उपस्थित राहू न शकलेल्या मुस्लिम एकल महिलांनाही संबंधित योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
एकल महिलांच्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठीही विशेष प्रयत्न
एकल महिलांच्या शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना विविध शासकीय तसेच शैक्षणिक शिष्यवृत्तींचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी पात्र विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांना उपलब्ध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
बैठकीत कोकणातील सामाजिक परिस्थितीबाबतही चर्चा झाली. कोकणात तलाकपीडित महिलांची संख्या तुलनेने कमी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. मुस्लिम समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते वाद निर्माण झाल्यास सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक कौटुंबिक वाद तुटेपर्यंत न ताणता संवाद आणि सामंजस्यातून सोडविण्याचे प्रयत्न केले जातात, असे सकारात्मक वास्तव बैठकीत समोर आले.
हक्काच्या योजनांचा लाभ मिळेपर्यंत पाठपुरावा
‘मुस्लिम समाज विकास संघ, जिल्हा रत्नागिरी’ ही नोंदणीकृत संस्था जिल्ह्यात मुस्लिम समाजातील विविध प्रश्नांवर कार्यरत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा या संस्थेत सहभाग असून, एकूण १९ मुस्लिम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
संस्थेचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयुब कापडी हे बैठकीला पूर्णवेळ उपस्थित होते. मुस्लिम एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोमवार, १७ ऑगस्ट रोजी पाठपुरावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
कडवई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काझी आपल्या सहकाऱ्यांसह बैठकीला उपस्थित होते. त्यांच्या प्रयत्नातून कडवई परिसरातील सात मुस्लिम एकल महिलाही बैठकीत सहभागी झाल्या. देवरुख येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. शेख यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कोकणातील सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असलेले युयुत्सु आर्ते यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. आयुब कापडी, काझी, डॉ. शेख, हमीद दलवाई इस्लामिक इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा इला दलवाई-कांबळी आणि सचिव राजेंद्र बहाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी आयुब कापडी, डॉ. शेख, काझी, रुबिना चव्हाण, युयुत्सु आर्ते आणि प्रदीप गुरव यांची समिती स्थापन करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक मुस्लिम एकल महिलेला तिच्या हक्काच्या शासकीय योजनेचा लाभ मिळेपर्यंत या समितीमार्फत सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संगमेश्वरनंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उपक्रम
संगमेश्वर तालुक्यातील या उपक्रमानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मुस्लिम एकल महिलांसाठी अशाच प्रकारचे कार्य उभे करण्याचे उद्दिष्ट बैठकीत निश्चित करण्यात आले. संबंधित महिलांना केवळ योजनांची माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता, प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि शासकीय कार्यालयांमधील पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येणार आहे.
दलवाई इन्स्टिट्यूटच्या ‘उब’ प्रकल्पाच्या प्रमुख रुबिना चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून ही महत्त्वपूर्ण बैठक यशस्वीपणे पार पडली.

