(देवरुख / सागर मुळ्ये)
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीसोबतच बदलत चाललेली आहारपद्धती, फास्ट फूडचे वाढते प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे विविध आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचाच प्रत्यय संगमेश्वर तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या स्वयंपूर्तता फाउंडेशनच्या हिमोग्लोबिन तपासणी मोहिमेतून आला आहे.
या मोहिमेत तालुक्यातील तब्बल ५० हजार विद्यार्थी आणि ग्रामस्थांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, आणि यातून ७० टक्के पुरुष आणि तब्बल ८० टक्के महिलांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या प्रोजेक्ट ऑफिसर दीपिका रांबाडे यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवरील सर्वेक्षण आणि स्थानिक अभ्यास
गुजरात येथील श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि स्वयंपूर्तता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही ॲनिमिया (हिमोग्लोबिन) तपासणी मोहीम राबविण्यात आली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सर्वेनुसार भारतात ७० टक्के जनता ॲनिमियाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चिंताजनक बाब लक्षात घेऊन श्रीमद रामचंद्र हॉस्पिटलने देशातील विविध जिल्ह्यांमध्ये हिमोग्लोबिन तपासणी व उपचार मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला.
या मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक संस्थांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील जबाबदारी स्वयंपूर्तता फाउंडेशनकडे सोपवण्यात आली असून, या फाउंडेशनने पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्याची तपासणी पूर्ण केली आहे.
विद्यार्थ्यांमध्येही चिंताजनक स्थिती
या तपासणीमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्येही हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. अनेक शाळांमध्ये प्रार्थनेदरम्यान किंवा खेळताना विद्यार्थी अचानक चक्कर येऊन पडतात — हे प्रकार केवळ हिमोग्लोबिन कमतरतेमुळे घडत असल्याचे फाउंडेशनच्या अहवालात नमूद आहे.
म्हणूनच फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या तपासणीला विशेष प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच शासकीय कार्यालये, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही ही तपासणी मोहीम राबविली आहे.
तपासणीतील आकडेवारी
एकूण तपासणी: ५०,००० नागरिकांची
पुरुष तपासणी: २४,७३५, त्यापैकी १७,३१४ (७०%) पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन कमी
महिला तपासणी: २५,१६५, त्यापैकी २०,१३२ (८०%) महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी
या आकडेवारीवरून महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळलेल्या प्रत्येक नागरिकाला, विशेषतः विद्यार्थ्यांना, तीन महिन्यांसाठी औषधांचा मोफत पुरवठा करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर फाउंडेशन पुन्हा एकदा त्याच शाळा आणि गावांमध्ये पुनर्तपासणी मोहीम राबविणार आहे. या पुनर्तपासणीत औषधोपचारानंतर हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले आहे का, याचे निरीक्षण केले जाणार आहे.
दीपिका रांबाडे यांनी विश्वास व्यक्त केला की, “या मोहिमेमुळे निश्चितच नागरिकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण सुधारेल आणि ॲनिमियाग्रस्त लोकसंख्या कमी होईल.”
संगमेश्वर तालुक्यातील ही आकडेवारी धोक्याची घंटा ठरली असून, तालुका ॲनिमिया मुक्त करण्यासाठी फाउंडेशनचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीमद रामचंद्र हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे ध्येय रत्नागिरी जिल्हा “पूर्णपणे ॲनिमिया मुक्त” करणे आहे. “आजची तरुण पिढी सशक्त राहिली, तर पुढील पिढीही आरोग्यदायी बनेल,” असा विश्वास रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.
दीपिका रांबाडे यांच्यासह फाउंडेशनचे सचिव युयुस्तु आर्ते, प्रोजेक्ट ऑफिसर स्वस्तिक रांबाडे आणि सर्व कर्मचारी या मोहिमेत मनापासून परिश्रम घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली.
फोटो: स्वयंपूर्तता फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांची ॲनिमिया तपासणी करतानाचा एक क्षण.

