(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात आज मोठी घडामोड घडली असून, उबाठा सेनेच्या गडाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. आंबेड खुर्दचे विद्यमान सरपंच चंद्रकांत रावजी फणसे यांनी आपल्या शेकडो समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत तालुक्यातील राजकीय समीकरणांनाच नवे वळण दिले आहे. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत आणि आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर श्रद्धा व्यक्त करत हा प्रवेश करण्यात आल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
तांबेवाडी येथे झालेला हा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी, कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा आणि उपस्थित ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर राजकीय जल्लोषात न्हाऊन निघाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाचा स्वीकार करताना अनेक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नव्या आशा आणि विकासाची अपेक्षा स्पष्टपणे दिसून येत होती.
या ऐतिहासिक प्रवेशामागे दिलीप सोमा घडशी, विजय विंजले, शशिकांत गीते, चंद्रकांत धाडवे, दीपक भाताडे, सुरेश गीते, सीताराम फणसे, दत्ताराम फणसे आणि प्रकाश विंजळे यांसारख्या स्थानिक नेतृत्वाने महत्त्वाची भूमिका बजावली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळत आज शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या वेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. “राजकारण हे माझ्यासाठी सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम आहे. आज सरपंच चंद्रकांत फणसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. ही माणसं माझी खरी ताकद आणि संपत्ती आहेत. त्यांच्या गावाचा, परिसराचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी तांबेवाडी परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही देत रस्ते, पाणी, नागरी सुविधा आणि स्थानिक प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन दिले. “नवीन सभागृह उभारल्याप्रमाणेच गावागावातील विकासाची स्वप्ने साकार करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच चंद्रकांत फणसे यांनीदेखील आपल्या मनोगतातून आमदार निकम यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. “दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून शेखर निकम यांच्याकडे आम्ही पाहतो. रस्ते, पाणी, नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांसाठी तत्परतेने धावून येणारे नेतृत्व म्हणून त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिथे कार्यकर्त्याला सन्मान मिळतो आणि विकासाची स्पष्ट दिशा दिसते, तिथे काम करण्याचे समाधान वेगळेच असते. म्हणूनच आम्ही सर्व सहकाऱ्यांनी विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.
या वेळी अजय बामणे, ऋतिक बामणे, रोशन बामणे, शुभम बामणे, प्रशांत फणसे, सुजाण फणसे, दत्ताराम फणसे, गंगाराम फणसे, प्रथमेश फणसे, तुकाराम फणसे, शितीन फणसे, नितीन फणसे, रामचंद्र फणसे, हरिचंद्र फणसे, रमेश फणसे, नितेश फणसे, रुपेश फणसे, शांताराम फणसे, किसन फणसे, किरण फणसे, जितेंद्र बामणे, राजेंद्र बामणे, ओंकार बामणे, वामन बामणे, स्वप्निल तांबे, कल्पेश तांबे, सोनू तांबे, दीपक तांबे, यश तांबे, प्रवेश तांबे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महिला कार्यकर्त्यांमध्ये सुरक्षा फणसे, सरिता तांबे, शुभांगी गीते, प्रणाली विंजले, रोशनी गीते, सुरेखा गीते, निता धाडवे, संगीता भाताडे, अस्मी गीते, विजया विंजले, दर्शना घडशी, सविता गीते, सुषमा फणसे, रेश्मा गीते, विमल गीते, दर्शना गीते, अश्विनी गीते, मंजुळा गीते, सीमा बामणे, जया पाताडे, वासंती तांबे, राजश्री गीते, करिष्मा फणसे आदींसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
या प्रवेश सोहळ्याला राजेंद्र पोमेंडकर, संजयराव कदम, राम शिंदे, तुषार बीजीतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कसबा जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात या पक्षप्रवेशामुळे मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
संगमेश्वर तालुक्यात झालेला हा पक्षप्रवेश केवळ राजकीय बदल नसून विकास, विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना मिळालेली नवी दिशा असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

