(रत्नागिरी / वार्ताहर)
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्र, रत्नागिरी पुरस्कृत मिटकॉन यांच्यामार्फत खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी येथे विविध व्यवसायाभिमुख प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रशिक्षणे विनामूल्य असून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
खेडमध्ये केटरिंगचे ३० दिवसांचे प्रशिक्षण
खेड येथे विशेष प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी केटरिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण ३० दिवसांचे असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना एक हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
संगमेश्वरमध्ये ब्युटी पार्लर प्रशिक्षण
संगमेश्वर-देवरुख येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४५ दिवसांचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना दीड हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र मिळणार आहे.
राजापुरात टेलरिंगचे प्रशिक्षण
राजापूर येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४५ दिवसांचे टेलरिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना दीड हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
रत्नागिरी-पाली येथे फॅशन डिझायनिंग
रत्नागिरी-पाली येथे सर्वसाधारण प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी दोन महिन्यांचे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण विनामूल्य असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना दोन हजार रुपये विद्यावेतन व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी पात्रता
या प्रशिक्षणांसाठी उमेदवार किमान सातवी उत्तीर्ण, रत्नागिरी जिल्ह्यातील रहिवासी, १८ ते ४५ वर्षे वयोगटातील आणि सुशिक्षित बेरोजगार असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित उमेदवाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहेत. खेड येथील विशेष प्रवर्गातील प्रशिक्षणासाठी जातीच्या प्रमाणपत्राची प्रत देखील जोडणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती अर्जासोबत जोडाव्यात.
२० ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
इच्छुक उमेदवारांनी २० ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधून प्रवेशाबाबतची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
खेड : दीक्षा माने – ८३२९९६९९४७
संगमेश्वर-देवरुख : रेश्मा पवार – ९४०३०४६६२९
राजापूर : सुधाकर भेरे – ९१५८४४९४०८
रत्नागिरी-पाली : कीर्ती राऊत – ९२८४५८९३२९
रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवक-युवतींना स्वयंरोजगार तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मिटकॉनतर्फे करण्यात आले आहे.

