(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील आंगवली लाखणवाडी येथील तीव्र उतारावर रिक्षा पलटी होऊन बोंड्ये येथील रिक्षाचालक विजय काशिराम चव्हाण (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला.
विजय चव्हाण हे प्रवाशांना आणण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच आंगवलीचे माजी सरपंच संतोष अणेराव, पोलीस पाटील सतीश अणेराव, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, अनंत जाधव आणि ललिता गुडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक ग्रामस्थांनी विजय चव्हाण यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
विजय चव्हाण यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच बोंड्ये येथील ग्रामस्थ तसेच देवरूख परिसरातील रिक्षाचालकांनी देवरूख ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

