(पुणे / वृत्तसंस्था)
रक्तदानातून माणसाचा श्वास आणि वृक्षसंवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो. सेवा हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असून, आपल्याला मिळालेले ज्ञान, सामर्थ्य, संपत्ती आणि कर्तृत्व यांचा उपयोग समाजकल्याणासाठी झाला पाहिजे. रक्तदान आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही सेवा मानवतेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या सेवायज्ञात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले.
समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त रविवारी खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स, पुणे येथे ‘ब्लड इन नीड’ या रक्तसेवा उपक्रमाच्या देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘ब्लड इन नीड’ अॅपचे लोकार्पण करण्यात आले. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना तातडीने रक्तदात्यांशी जोडण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला देशव्यापी स्वरूप देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक अंकित काणे, डॉ. रचना पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘जीवदानापेक्षा श्रेष्ठ यज्ञ दुसरा नाही’
रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी म्हणाले, “जीवनाची खरी समृद्धी आपण किती मिळवले यावर ठरत नाही; तर आपल्या अस्तित्वामुळे किती जीवांना आधार मिळाला, यावर ती ठरते. ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याने ज्ञानयज्ञ करावा. ज्याच्याकडे श्रमशक्ती आहे, त्याने श्रमयज्ञ करावा आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे, त्याने दानयज्ञ करावा. आजच्या काळात निरोगी व्यक्तीने रक्तदानाचा यज्ञ करावा आणि संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीने रक्तमित्र बनून या करुणामय सेवेत सहभागी व्हावे.”
“एखाद्या जीवाला जीवदान मिळाले, यापेक्षा श्रेष्ठ यज्ञ दुसरा कोणताही असू शकत नाही. रक्तदानामुळे एखाद्या गरजू व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेची सेवा आहे. त्याचप्रमाणे वृक्षांचे संवर्धन करणे ही संपूर्ण सृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली सेवा आहे. माणसांचा श्वास रक्तदानामुळे आणि सृष्टीचा श्वास वृक्षसंवर्धनामुळे अखंड राहतो,” असेही त्यांनी सांगितले.
‘झाड हेच माझ्यासाठी सेलिब्रिटी’ : सयाजी शिंदे
ज्येष्ठ अभिनेते आणि वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने कार्य करणारे सयाजी शिंदे म्हणाले, “झाड आधी आले आणि मग माणूस आला. माणूस कितीही मोठा झाला, सेलिब्रिटी झाला तरी तो ऑक्सिजन तयार करू शकत नाही. तो ऑक्सिजन त्याला झाडापासूनच मिळतो. त्यामुळे झाड हेच माझ्यासाठी खरे सेलिब्रिटी आहे.”
“सकाळी उठल्यानंतर मोकळेपणाने श्वास घेता येणे आणि भरपूर ऑक्सिजन मिळणे हीच खरी श्रीमंती आहे. ही श्रीमंती टिकवायची असेल तर आपण मोठ्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत आणि लावलेल्या झाडांचे संवर्धनही केले पाहिजे. केवळ वृक्षारोपण करून आपली जबाबदारी संपत नाही, तर त्या झाडांचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सेवा धर्माची जपणूक गरजेची : अंकित काणे
‘सकाळ’ माध्यम समूहाचे संपादक अंकित काणे म्हणाले, “हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. ज्याला जी गरज आहे, त्याला ती पुरवणे हा सेवाभाव आपला धर्म शिकवतो. या सेवा धर्माची जपणूक रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी करत आहेत. धर्माचे तत्त्वज्ञान केवळ बोलण्यात न ठेवता ते कृतीत आणणाऱ्या त्यांच्या सारख्या माणसांच्या आपण मागे उभे राहिले पाहिजे.”
समाजातील गरजू व्यक्तीपर्यंत सेवा पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याचे नमूद करत त्यांनी अशा उपक्रमांना व्यापक सामाजिक पाठबळ मिळण्याची गरज व्यक्त केली.
रक्तदात्यापर्यंत पोहोचविणारे उपयुक्त माध्यम
महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर यांनी ‘ब्लड इन नीड’ अॅपचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “रक्ताची गरज असलेल्या व्यक्तीला रक्तदात्यापर्यंत पोहोचवून देण्याचे मोलाचे काम करणारे हे कदाचित पहिले अॅप असेल. रक्ताची आवश्यकता निर्माण झाल्यानंतर योग्य रक्तगटाचा रक्तदाता वेळेत उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रक्तदाते आणि गरजू रुग्ण यांच्यात समन्वय साधण्याचे काम या अॅपच्या माध्यमातून होऊ शकते.”
“ही संकल्पना शासनाच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात कशी राबविता येईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. रक्तदानाची चळवळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असेही डॉ. मोहनळकर यांनी सांगितले.
‘निरोगी असणे हीच खरी संपत्ती’
डॉ. रचना पवार म्हणाल्या, “निरोगी असणे हीच खरी संपत्ती आहे. निरोगी व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर त्याच्या रक्तामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान मिळू शकते. त्यामुळे निरोगी व्यक्तींनी नियमितपणे रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. रक्तदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करून अधिकाधिक नागरिकांना या चळवळीत सहभागी करून घेणे आवश्यक आहे.”
अॅपच्या कार्यप्रणालीचे प्रात्यक्षिक
कार्यक्रमादरम्यान रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ‘ब्लड इन नीड’ अॅपची कार्यप्रणाली उपस्थितांना डेमोच्या माध्यमातून समजावून सांगितली. रक्ताची गरज असलेल्या व्यक्तीला आवश्यक रक्तगटाचा रक्तदाता शोधण्यापासून ते रक्तदात्याशी संपर्क साधण्यापर्यंतची प्रक्रिया अॅपच्या माध्यमातून कशी सुलभ होते, याची माहिती यावेळी देण्यात आली.
रक्तसेवेच्या या उपक्रमाच्या उभारणीत आणि विस्तारात योगदान देणाऱ्या तरुण, उच्चशिक्षित सेवक-सेविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या तरुणांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रक्तदान चळवळीला अधिक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप देण्यासाठी केलेल्या योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.
पाच लाखांहून अधिक रक्तदाते आणि रक्तमित्रांची नोंद
‘ब्लड इन नीड’ अॅपवर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक रक्तदाते आणि रक्तमित्रांची नोंद झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत मदत मिळावी आणि रक्तदात्यांचे एक व्यापक नेटवर्क तयार व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचा देशभर विस्तार करण्यात येत आहे.
रक्तदानाच्या या सेवाकार्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, ‘ब्लड इन नीड’ अॅप डाउनलोड करून रक्तदाता किंवा रक्तमित्र म्हणून नोंदणी करावी आणि गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन श्रद्धा बोडेकर यांनी केले.

