(रत्नागिरी / वार्ताहर)
राज्यातील अनेक ठिकाणी एसटी महामंडळाच्या तिकीट मशीनमध्ये गुरुवारी सकाळपासून अचानक बिघाड झाल्याने त्याचा थेट फटका प्रवाशांना बसला. मशीनमधील तांत्रिक बिघाडामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या तिकीट सवलतीचा पर्याय उपलब्ध न झाल्याने काही प्रवाशांकडून पूर्ण तिकीटाचे पैसे आकारण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडासह मनस्ताप सहन करावा लागला.
आज (गुरुवारी) सायंकाळी जत-रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून पूर्ण तिकीटाचे पैसे घेण्यात आल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर अधिक माहिती घेतली असता, राज्यातील अनेक ठिकाणी अशाच प्रकारे मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. परिणामी सवलतीच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पैशांचे गणित बिघडले.
एसटीच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर महामंडळाचे उत्पन्न मात्र वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र आज दिवसभर प्रवाशांना या तांत्रिक समस्येचा त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. काही प्रवाशांनी प्रवासासाठी सोबत आणलेले पैसे संपल्याने एसटीचा प्रवास अर्ध्यावर सोडल्याचेही ऐकिवात आले आहे.
कर्नाटक सार्वजनिक बससेवेचा दाखला देत काही प्रवाशांनी महाराष्ट्रातील एसटीच्या सवलतीच्या प्रवासाच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. कर्नाटकात महिलांना कोणताही पुरावा न मागता सार्वजनिक बसमधून मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते, असे या प्रवाशांचे म्हणणे आहे. कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रातही त्याच तिकीटदरात किंवा दोन ते चार रुपयांच्या फरकाने धावत असताना महाराष्ट्र एसटी महामंडळ तोट्यात कसे, हा प्रश्न अनेक वर्षांपासून अनुत्तरित असल्याचेही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अशा तांत्रिक पद्धतींचा वापर केला जात नाही ना, असा सवालही सर्वसामान्य प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही महिलांना कोणताही पुरावा न मागता एसटीचा मोफत प्रवास का उपलब्ध करून दिला जात नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने कार्डची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यासाठी २०० रुपये आकारले जातात. या कार्डची किंमत २०० रुपये असतानाच त्यानंतरच्या प्रत्येक प्रवासात महिलांना तिकीटासाठी पैसे भरावे लागतात. त्यामुळे कार्डसाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कासह सवलतीच्या प्रवासाची संपूर्ण व्यवस्था प्रवाशांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
बसचे रनिंग पूर्ण करण्यासाठी, बसची संख्या कमी पडत असल्याने किंवा महामंडळाला अधिक उत्पन्न मिळावे म्हणून असे केले जाते का, असा प्रश्न काही प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
प्रवाशांकडून अशा प्रकारे अतिरिक्त पैसे घेतले जाणे ही महामंडळाची वसुलीची पद्धत तर नाही ना, असा सवालही या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
सध्या एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसही धावत आहेत. मात्र, या बसेसचे चालक आणि वाहने खासगी असून वाहक एसटी महामंडळाचे असल्याचे दिसून येते. एसटी महामंडळाने या इलेक्ट्रिक बसेस ‘वेट-लीज’ (Wet-Lease) तत्त्वावर खाजगी कंपन्यांकडून किंवा कंत्राटदारांकडून भाड्याने घेतल्या आहेत. बसची देखभाल, चार्जिंग आणि दुरुस्तीचे कामही संबंधित खाजगी कंपनीच करते. त्यामुळे या बसेसना वाढीव फेऱ्या दिल्या जातात का, तसेच या बसेस महामंडळाच्या सेवेत कशा दाखल झाल्या, याबाबतही सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची सेवा असून ती त्याच स्वरूपात सुरू राहण्यासाठी महामंडळाचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात योग्य समन्वय राहण्याची गरज असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.


