(ठाणे)
कल्याण येथील आधारवाडी कारागृहमध्ये कैद्याची भेट घडवून देण्यासाठी चक्क लाच मागितल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचत दोन कारागृह कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे संपूर्ण जेल प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या किंवा न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैद्यांच्या नातेवाईकांना नियमानुसार भेट घेण्याचा हक्क आहे. मात्र, याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत कारागृहातील दोन कर्मचाऱ्यांनी एका कैद्याची भेट घडवून देण्यासाठी 1,500 रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
लाच मागितल्याने संबंधित नातेवाईकांनी कोणतीही तडजोड न करता थेट अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत ठाणे ACB पथकाने पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळताच कारागृह परिसरात सापळा रचण्यात आला.
लाच स्वीकारताना दोघे रंगेहात पकडले
शरद पानपाटील आणि सतीश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने 1,500 रुपये देण्यासाठी संपर्क साधताच, लाचेची रक्कम स्वीकारताना ACB पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे जेल परिसरात मोठी गडबड उडाली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. खडकपाडा पोलीस ठाणे येथे संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली आहे.
जेल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणी, जिथे सुरक्षा, शिस्त आणि नियमांचे पालन अत्यंत महत्त्वाचे असते, तिथेच लाचखोरीचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास ACBकडून सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

