(रत्नागिरी / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून देत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी डॉ. मनोहर चांडगे, माजी सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, नागपूर तसेच माजी विभागप्रमुख, मत्स्य संपत्ती, अर्थशास्त्र, सांख्यिकी आणि विस्तार शिक्षण, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले.
प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी प्रमुख अतिथी डॉ. मनोहर चांडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आणि उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ. मनोहर चांडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमातील प्रास्ताविक सत्रात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध नियम व शैक्षणिक बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक प्राध्यापक श्री. तौसिफ काझी यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक नियमावलीची माहिती दिली. वसतिगृह प्रमुख डॉ. सुशील कांबळे यांनी वसतिगृहातील शिस्त व नियमावली स्पष्ट केली. सहाय्यक प्राध्यापक श्री. निलेश मिरजकर यांनी अभ्यासक्रमाची रचना आणि विद्यार्थी परिषदेविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक प्राध्यापक डॉ. राकेश जाधव यांनी शिस्त व विद्यापीठाच्या आचारसंहितेतील नियमांची माहिती दिली. सहाय्यक अध्यापक श्रीमती मयुरी डोंगरे यांनी अँटी रॅगिंग नियमांविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासोबतच त्यांचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या अखेरीस चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी पदविकाधारकांची मत्स्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक वृत्ती यांच्या बळावर आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी डोंगरे यांनी केले, तर सहाय्यक प्राध्यापक श्री. रोहित बुरटे यांनी आभार मानले. ‘दीक्षारंभ’ कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०च्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमातून नवोदित विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक नियम, शिस्त आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळण्याबरोबरच उद्योजकता, सामाजिक जबाबदारी, सहकार्याची भावना आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रेरणा देण्यात आली.


