(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील लोवले येथील रहिवासी आणि सलग ३० वर्षे वृत्तपत्र वितरणाचे काम करणारे नामदेव शांताराम महाडिक (६०) यांचे आज (गुरुवारी) डेरवण रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या निधनाने लोवले ग्रामस्थ, मित्रपरिवार तसेच वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित व्यक्तींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नामदेव महाडिक यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांना प्रथम रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी बुधवारी डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
महाडिक यांनी कै. गजानन खातू यांच्या ‘सुप्रभाती सेविका’ तसेच कै. रंगनाथ खातू यांच्या संगमेश्वर बसस्थानकातील पेपर स्टॉलवर जवळपास ३० वर्षे सलग काम केले. वृत्तपत्र व्यवसायाशी दीर्घकाळ संबंध असल्याने संगमेश्वर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पत्रकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे हस्ताक्षर उत्तम असल्याने काही काळ त्यांनी बातम्या लिहिण्याचे कामही केले. परिसरातील विविध घटनांची माहिती मिळाल्यानंतर ती पत्रकारांपर्यंत विनाविलंब पोहोचविण्याचे काम ते करत असत.
नामदेव महाडिक हे ५५ टक्के दिव्यांग होते. मात्र, दिव्यांगत्वावर मात करत त्यांनी आयुष्यभर कष्टाची कामे केली. पेपर स्टॉलवरील कामानंतर गेल्या सहा वर्षांपासून ते दिलीप दोरकडे यांच्या हाराच्या दुकानात कार्यरत होते. या काळात त्यांनी हार तयार करण्याची कलाही आत्मसात केली होती.
नामदेव महाडिक यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या आकस्मिक निधनाने लोवले ग्रामस्थ आणि त्यांच्या मित्रपरिवारातून दुःख व्यक्त करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.


