(नवी दिल्ली / वृत्तसंस्था)
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज (सोमवारी) पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या टीममध्ये महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान मिळाले असून, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी, तर विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीत स्मृती इराणी यांच्यावरही राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून पराभव झाल्यानंतर आता त्यांना पुन्हा पक्षाच्या राष्ट्रीय संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे इराणींचे राष्ट्रीय राजकारणात पुनरागमन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पक्षाचे बी. एल. संतोष यांना राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर शिवप्रकाश आणि सौदान सिंह यांची राष्ट्रीय सह-सरचिटणीस (संघटना) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचे नाव असलेल्या विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची पुन्हा राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सोशल मीडिया संघटनेतही बदल
भाजपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. दीपक म्हस्के यांची सोशल मीडिया संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राच्या प्रीती गांधी यांच्यासह शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट आणि अरुण यादव यांची सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध मोर्चांच्या अध्यक्षांची नियुक्ती
भाजपने पक्षाच्या विविध मोर्चांच्या अध्यक्षांचीही घोषणा केली आहे.
- भाजप युवा मोर्चा : डॉ. हेमंग जोशी, गुजरात
- महिला मोर्चा : रूप कुमारी चौधरी, छत्तीसगड
- ओबीसी मोर्चा : अमरपाल मौर्य, उत्तर प्रदेश
- किसान मोर्चा : बन्सीलाल गुर्जर, मध्य प्रदेश
- एससी मोर्चा : शिवेश कुमार राम, बिहार
- एसटी मोर्चा : डॉ. मन्नालाल रावत, राजस्थान
- अल्पसंख्याक मोर्चा : कुँवर बासित अली, उत्तर प्रदेश
याशिवाय तरुण चुघ यांच्याकडे केंद्रीय कार्यालय प्रभारीपदाची, तर अनिल बलुनी यांच्याकडे मीडिया संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखालील नव्या टीममध्ये अनुभवी नेत्यांसोबत विविध राज्यांतील नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. आगामी राजकीय आणि संघटनात्मक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या नव्या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

