(मुंबई)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत. अवघ्या आठवडाभरात मराठा समाजासाठी तीन मोठ्या घोषणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सरकारने आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलल्याचे चित्र दिसत आहे.
30 मे रोजी भर उन्हात मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सरकारकडून तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर तब्बल 14 तासांनंतर त्यांनी मध्यरात्री उपोषण स्थगित केले. मात्र मागण्यांवर दोन दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलती, आर्थिक मदत आणि अनुकंपा तत्त्वावरील नोकरी यांसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
मराठा समाजाला OBC विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सवलती
राज्य सरकारने इतर मागासवर्गीय (OBC) विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी केला. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्ती, फी प्रतिपूर्ती, व्यावसायिक प्रशिक्षण सवलती आणि इतर शैक्षणिक योजना लागू होणार आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC प्रमाणे सर्व शैक्षणिक लाभ देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानंतर मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेण्यात आला.
महाडीबीटी पोर्टलवर होणार तांत्रिक बदल
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांना महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर आवश्यक तांत्रिक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाला यासाठी सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्रमुख शैक्षणिक सवलती
1) शालांत परीक्षाोत्तर शिष्यवृत्ती योजना
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांनाही “शालांत परीक्षाोत्तर शिष्यवृत्ती योजना” लागू करण्यात आली आहे. विविध व्यावसायिक आणि उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी ही योजना लागू असेल.
2) इयत्ता 9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी लागू असलेली विशेष शिष्यवृत्ती योजना आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे.
3) शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती थेट शासनाकडून केली जाणार आहे.
4) परराज्यातील शिक्षणासाठी आर्थिक सवलत
महाराष्ट्रातील विद्यार्थी जर इतर राज्यांतील अनुदानित किंवा विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतील, तर त्यांनाही शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळणार आहे.
5) ITI आणि व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) तसेच खासगी ITI मधील पीपीपी योजनेंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे.
6) CAP नंतरच्या रिक्त जागांवरील विद्यार्थ्यांनाही लाभ
केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया (CAP) पूर्ण झाल्यानंतर संस्थास्तरावर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांनाही OBC विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती लागू राहणार आहेत.
आंदोलनातील मृतांच्या वारसांना नोकरी आणि आर्थिक मदत
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठीही राज्य सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही दिवसांपूर्वीच आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांना एमआयडीसीमध्ये (MIDC) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. याशिवाय मराठा आरक्षण आंदोलनातील उर्वरित 34 मृत आंदोलकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयासाठी 8 जिल्ह्यांतील कुटुंबीयांना एकूण 3 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्याच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष
मराठा समाजासाठी घेतलेल्या या निर्णयांमुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आगामी काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार आणखी कोणते निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

