(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा रानपाटच्या माजी विद्यार्थी संघाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील प्रसिद्ध सांस्कृतिक मंडळ ‘जय महाराष्ट्र कला पथक रानपाट’ने सामाजिक बांधिलकी जपत शाळेला ४३ इंची स्मार्ट टीव्ही भेट दिला.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर स्मार्ट टीव्हीची भेट शाळेचे मुख्याध्यापक तथा माजी विद्यार्थी संघाचे सचिव सुहास भितळे आणि माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मयुर गोनबरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
शैक्षणिक उपक्रमांसाठी स्मार्ट टीव्हीचा उपयोग होणार असून, विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून विविध शैक्षणिक साहित्य, दृकश्राव्य माहिती आणि शैक्षणिक उपक्रम समजून घेण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘जय महाराष्ट्र कला पथक रानपाट’च्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी कला पथकाचे अनेक सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर उपस्थितांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमातही सहभाग घेतला.
दरम्यान, अंगणवाडी सेविका भक्ती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अविष्कार दीपक गोनबरे याने स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगणारे आत्मविश्वासपूर्ण भाषण केले. त्याच्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

