(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ८ ऑगस्ट रोजी जाहीर केलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त आता आणखी १६ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईसह गुजरात आणि अन्य भागांतून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची प्रवासाची गैरसोय काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुंबई सेंट्रल–ठोकूर विशेष साप्ताहिक गाडी (०९०१३) ८ सप्टेंबर रोजी धावणार असून, तिची परतीची ठोकूर–मुंबई सेंट्रल गाडी (०९०१४) ९ सप्टेंबर रोजी धावेल. तसेच मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेष गाडी (०९०१९) ९ सप्टेंबरला सुटणार असून, सावंतवाडी रोड–मुंबई सेंट्रल (०९०२०) ही परतीची गाडी १० सप्टेंबर रोजी धावणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता बांद्रा टर्मिनस–रत्नागिरी अनारक्षित विशेष गाडी (०९०३५) १० सप्टेंबर रोजी धावणार आहे. तिची परतीची रत्नागिरी–बांद्रा टर्मिनस गाडी (०९०३६) ११ सप्टेंबर रोजी धावेल. दरम्यान, गुजरातमधून कोकणात येणाऱ्या भाविकांसाठीही विशेष गाड्यांची सुविधा करण्यात आली आहे. वडोदरा–रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी (०९११४) ८ आणि २२ सप्टेंबर रोजी धावणार असून, रत्नागिरी–वडोदरा (०९११३) ही गाडी ९ आणि २३ सप्टेंबर रोजी धावणार आहे.
गुजरातमधूनही कोकणासाठी विशेष रेल्वे
विश्वामित्री–रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष गाडी (०९११०/०९१०९) यांच्या अनुक्रमे ९ व १० सप्टेंबर रोजी फेऱ्या होणार आहेत. तसेच ०९१२४/०९१२३ या गाडीची ७ सप्टेंबर रोजी विशेष फेरी नियोजित करण्यात आली आहे. याशिवाय उधना–रत्नागिरी विशेष गाडी (०९०२२/०९०२१) १० सप्टेंबर रोजी, तर वलसाड–रत्नागिरी विशेष साप्ताहिक गाडी (०९०३०/०९०२९) ७ व ८ सप्टेंबर रोजी धावणार आहे. त्यामुळे गुजरातमधील गणेशभक्तांनाही कोकण गाठण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार आहेत.
परतीच्या गाड्यांचे आरक्षण सुरू
गाडी क्रमांक ०९०१४, ०९०२०, ०९०३६, ०९११३, ०९१०९, ०९१२३, ०९०२१ आणि ०९०२९ या परतीच्या विशेष गाड्यांचे आरक्षण १५ ऑगस्ट २०२६ पासून संगणकीय आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट तसेच आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरू झाले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांनी गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेष गाड्यांचे थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशील रेल्वेच्या अधिकृत चौकशी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. गणरायाच्या आगमनापूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढत असताना अतिरिक्त १६ फेऱ्यांमुळे गणेशभक्तांच्या प्रवासाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

