(मुंबई / वृत्तसंस्था)
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून राजकीय वातावरण तापले असताना मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत जनमोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात हा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यात इतर राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पुढाकाराने होणारा हा मोर्चा केवळ दोन पक्षांपुरता मर्यादित न ठेवता जनतेचा मोर्चा करण्याची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांशी संवाद साधून त्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याचे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. ‘एसआयआर’च्या नावाखाली मतदारांची फसवणूक केल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
या महामोर्चाची घोषणा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतही केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या कारभारावर त्यांनी टीका केली. “मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठीच निर्णय घेतले जात असल्याचे आयोगातील इतर दोन आयुक्तांच्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. देशातील स्वायत्त संस्थांना मोदी-शाहांचे घरगडी बनवले गेले असून, ही थेट लोकशाहीची हत्या आणि स्वातंत्र्याची गळचेपी आहे. जोपर्यंत ज्ञानेश कुमार पदावर राहतील, तोपर्यंत देशाच्या लोकशाहीची प्रकृती बिघडलेलीच राहील,” असा आरोप राऊत यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राचा रोष व्यक्त करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचेही राऊत यांनी सांगितले. या चर्चेनंतर ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत विराट आणि ऐतिहासिक महामोर्चा काढण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांचे यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा करत सर्वांनी या मोर्चात एकत्र यावे, अशी ठाकरे बंधूंची इच्छा असल्याचे राऊत यांनी सांगितले. काँग्रेस, राहुल गांधी आणि इतर प्रमुख विरोधी पक्षांशी यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. देशातील लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन ठाकरे बंधूंनी केले आहे. मात्र, ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची वेळ आणि नेमके ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याबाबतची माहिती लवकरच देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांनी २ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाविरोधात पुकारलेल्या आंदोलनालाही शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. देशात निर्माण झालेले जनक्षोभाचे वातावरण पाहता दबाव झुगारून निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाला या गंभीर प्रकाराची दखल घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
एकीकडे ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली जात असताना आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून संयुक्त जनमोर्चाची घोषणा केली आहे. त्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


